'तुमच्या कामाशी काम ठेवा, अन्यथा...', शाहिद आफ्रिदीने जाहीर कार्यक्रमात क्रिकेट बोर्ड प्रमुखांना सुनावलं

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाच्या कामगिरीमुळे आधीच टीकेचा भडीमार होत असताना कर्णधार बाबर आझम आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख जका अशरफ यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.   

शिवराज यादव | Updated: Nov 1, 2023, 01:11 PM IST
'तुमच्या कामाशी काम ठेवा, अन्यथा...', शाहिद आफ्रिदीने जाहीर कार्यक्रमात क्रिकेट बोर्ड प्रमुखांना सुनावलं title=

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. पाकिस्तान संघाला अद्यापही सेमी-फायनलमध्ये स्थान मिळण्याचं संधी आहे, मात्र हा प्रवास खडतर आहे. एकीकडे संघाच्या कामगिरीवरुन टीकेचा भडीमार सुरु असतानाच बाबर आझम याचं चॅट लीक झालं आहे. पाकिस्तानधील टीव्ही चॅनेलने या कथित चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 

चॅनेलने दाखवलेल्या या चॅटमध्ये सलमान नावाच्या एका व्यक्तीने लिहिलं आहे की, "बाबर, टीव्ही आणि सोशल मीडियावर एक बातमी पसरली आहे की, तू चेअरमनला फोन करत आहेस आणि ते उत्तर देत नाही आहेत. तू त्यांना मागील काही दिवसात फोन केला होतास का?". यानंतर त्याच्या या मेसेजला ज्याने उत्तर दिलं आहे, त्याचं नाव 'Babar Azam New' नावाने सेव्ह आहे. उत्तर देत त्याने लिहिलं आहे की 'सलमान भाई, मी फोन नव्हता केला'.

यादरम्यान हे व्हॉट्सअप चॅट चॅनेलवर दाखवणाऱ्या न्यूज अँकर वसीम बदामीने आपल्याला पाकिस्तान क्रिके बोर्डाच्या प्रमुखांनीच कार्यक्रमादरम्यान हे चॅट दाखवण्यास सांगितलं असल्याचा खुलासा केला. आपल्याला कार्यक्रम सुरु होण्याच्या 7 मिनिटं आधी जका अशरफ यांनी एक व्हिडीओ क्लिप पाठवत हा मेसेज दाखवण्यास सांगितलं असल्याची माहिती एक्सवर पोस्ट करत दिली. दरम्यान आपण हे चुकीचं केलं असून, यासाठी बाबर आझमची परवानगीही घ्यायला हवी होती असं सांगितलं आहे. 

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने जका अशरफ यांना खडेबोल सुनावले आहेत. "जका अशरफ तुम्ही काही क्लबचे चेअरमन नाहीत. तुम्ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन आहात. तुम्ही अनेक गोष्टींचं निरीक्षण करायला हवं. तुम्ही मीडिया हाऊसच्या मालकांना फोन करुन कोण तुमच्याबद्दल काय बोललं हे सांगत आहात. तुम्ही चेअरमन आहात हे विसरु नका. तुम्ही तुमचं काम करा आणि त्याचा निकाल द्या. तुम्ही संधी दिली असल्यानेच लोक तुमच्याबद्दल बोलत आहेत," असं शाहिद आफ्रिदीने समा टीव्हीवरुन सुनावलं आहे. 

"तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. संघ वर्ल्डकप खेळत आहे आणि तुम्ही एकामागोमाग एक विधानं करत आहात. कधी तुम्ही बाबर तर कधी इतरांबद्दल बोलता. आधी तुमचं पद भक्कम करा. क्रिकेटर्सना तुमच्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करा. लोक तुमच्याबद्दल काय बोलत आहेत ते बाजूला ठेवा. तुम्हीच त्यांना संधी देत आहात. तुमच्या कामाशी मतलब ठेवा," असा संताप शाहिद आफ्रिदीने व्यक्त केला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि पीसीबीचे प्रमुख जका अशरफ यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कामगिरीच्या आधारे काही कठोर निर्णय घेतले जातील असं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरच या चर्चांना उधाण आलं आहे.