'एखादा सामना हरलात तरी...'; सलग 3 विजयानंतर पाँटिंगचा रोहित-विराटला इशारा

World Cup 2023 Ricky Ponting On Indian Team : भारताने वर्ल्ड कप स्पर्धेमधील आपले पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानला पराभूत केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 19, 2023, 01:54 PM IST
'एखादा सामना हरलात तरी...'; सलग 3 विजयानंतर पाँटिंगचा रोहित-विराटला इशारा title=
भारताच्या चौथ्या सामन्याआधीच पाँटिंगचा सूचक इशारा

World Cup 2023 Ricky Ponting On Indian Team: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेला भारताने दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या दादा संघावरील मोठ्या विजयानंतर अफगाणिस्तानलाही भारताने पराभूत केलं. पाकिस्तानविरुद्धचा हाय प्रेशर सामना भारताने 7 विकेट्स राखून जिंकत पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेण्याचा पराक्रम केला. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संभाव्य संघांच्या यादीत भारताचं नाव अग्रस्थानी आहे असं अनेक आजी-माजी खेळाडूंनी म्हटलं आहे. भारताला पराभूत करणारा संघ हा वर्ल्ड कपवर दावा सांगणारा प्रमुख संघ असेल असा दावाही केला जात आहे. असं असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने भारताला सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुण्यामध्ये बांगलादेशविरुद्ध होत असलेल्या सामन्याआधीच पाँटिंगने 2011 च्या विश्वविजेत्या संघाला इशारा दिला आहे. घरच्या मैदानांमध्ये चाहत्यांसमोर खेळताना एखाद्या सामन्यात जरी भारताने वाईट खेळ केला तरी भारतीय संघ तणावात जाईल असं पाँटिंगने म्हटलं आहे.

भारत अजेय

पहिल्या 3 सामन्यांमध्ये तरी रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला जाईल त्या मैदानात भारतीय चाहत्यांनी मोठा पाठिंबा दिला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय संघाकडून असणाऱ्या अपेक्षाही वाढल्या आहेत. भारताच्या सर्वच सामन्यांना गर्दी होईल असं म्हटलं जात आहे. भारताच्या सर्व सामन्यांना आतापर्यंत गर्दी झालेली आहे. भारतीय संघानेही चाहत्यांचा कधीच हिरमोड केलेला नाही. भारताने ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सने पराभूत केलं. अफगाणिस्तानला 8 विकेट्सने तर पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत करत भारत आतापर्यंत स्पर्धेत अजेय राहिला आहे. 

पाँटिंगने दिला इशारा

मात्र, असं असताना "साखळी फेरीत भारतीय संघ एखाद्या सामन्यात घरच्या चाहत्यांसमोर पराभूत झाला तर चाहते कसे व्यक्त होतील? एक संघ म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही एखाद्या सामन्यात वाईट खेळी केली तरी तणाव प्रचंड वाढू शकतो. अर्थात सध्या त्यांनी उत्तम सुरुवात केली आहे. पण काहीही होऊ शकतं," असं पाँटिंग अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाला आहे. यावरुनच पाँटिंगला वेगळा निकाल लागला तर भारतीय चाहत्यांचं अती प्रेम हे वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतं असं सूचित करायचं आहे.

भारताला पराभूत करणं कठीण पण..

आपल्या संघाला 2 वेळा वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या पाँटिंगने भारतीय संघ परिपूर्ण असल्याचंही म्हटलं आहे. "मी सुरुवातीपासूनच सांगत आलेलो आहे की हा (भारतीय) संघ पराभूत करण्यासाठी फार आवाहात्मक संघ आहे. हा संघ फार टॅलेंटेड आहे," असं पाँटिंग म्हणाला आहे. "त्यांची वेगवान गोलंदाजी उत्तम आहे. त्यांची फिरकी गोलंदाजी, फलंदाजी, मधल्या फळीतील फलंदाज, सलामीवीर सर्वच उत्तम आहेत. त्यांना पराभूत करणं कठीण आहे. आता फार तणावाखाली ते कसे खेळतात हे महत्त्वाचं आहे," असं पाँटिंग म्हणालाय.

मोठ्या संघांविरोधातील सामने बाकी

भारताचे मोठ्या संघांविरोधातील सामने अजूनही बाकी आहेत याकडेही पाँटिंगने लक्ष वेधलं. न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे भारताचे सामने अजून झालेले नाहीत. त्यामुळे विजयाची मालिका मोडणं कोणत्याही संघाला परवडणारं नाही असं पाँटिंग म्हणाला आहे. "ते प्रेशरखाली येणार नाहीत किंवा तणावाचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. मात्र असं नक्की होईल जशी स्पर्धा पुढे जाईल," असं पाँटिंगने म्हटलं आहे.