19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलायची असेल तर...; पाकिस्तानला मॉर्कलचा गुरुमंत्र

World Cup 2023 Pakistan Performance: पाकिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील पहिल्या 5 सामन्यांपैकी 3 सामने गमावले आहेत. पाकिस्तानला सेमीफायनलसाठी पात्र होण्याच्या दृष्टीनेही फार कष्ट करावे लागणार आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 26, 2023, 04:52 PM IST
19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलायची असेल तर...; पाकिस्तानला मॉर्कलचा गुरुमंत्र title=
पाकिस्तानच्या कामगिरीसंदर्भात बोलताना केलं विधान

World Cup 2023 Pakistan Performance: असं म्हणतात की, कोणत्याही सांघिक खेळामध्ये प्लॅन ए काम करत नसेल तर संघाकडे प्लॅन बी तयार असावा. मात्र सध्या भारतात सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कडे पाहिलं तर पाकिस्तानी संघाकडे असा कोणताही प्लॅन बी नसल्याचं स्पष्ट होत आहे. पाकिस्तानी संघाने आपल्या पहिल्या 5 पैकी 3 सामने गमावले आहेत. पाकिस्तानी संघाचा नुकताच झालेला पराभव हा चक्क अफगाणिस्तानच्या संघाकडून झाला असून हा जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील धक्कादायक निकालांपैकी एक मानला जात आहे. मात्र आता याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक असलेल्या मॉर्नी मॉरकलने एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानी गोलंदाजीसंदर्भात मॉरकलने हा खुलासा केला आहे.

सलग 3 पराभव

सध्या पाकिस्तानची वर्ल्ड कप 2023 मधील वाटचाल अडखळत सुरु असण्यामागील सर्वात मोठं कारण ठरत आहे पाकिस्तानची गोलंदाजी. वर्ल्ड कप सुरु होण्याआधी जगातील सर्वोत्तम गोलंदाजी असलेला संघ असा पाकिस्तानी संघाचा गवगवा होता. मात्र हे सारे फोल ठरले आहेत. पाकिस्तानी संघाची गोलंदाजी अगदीच सुमार राहिली असून त्यामुळेच अफगाणिस्तानसारख्या संघानेही 1992 च्या जग्गजेत्या संघाला 8 विकेट्सने पराभूत केलं. भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केल्यानंतर नंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 62 धावांनी सामना जिंकत पाणी पाजलं. पाकिस्तानच्या पराभवाची हॅटट्रीक अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात झाली. 

नक्की वाचा >> 'माझ्यावर इंग्लिश...'; पाकिस्तानी खेळाडूची मोदींकडे याचना! भारताचं नागरिकत्व घेण्यासही तयार

'भारतामध्ये हे फार महत्त्वाचं आहे की...'

पाकिस्तानसाठी केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने चमकदार कामगिरी करत 5 विकेट्स घेतल्या तेवढा एकच काय तो अपवाद. मात्र या सामन्यात हॅरीस रौफ आणि हसन अलीसारख्या दमदार गोलंदाजांच्या गोलंदाजीची पिसं डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी काढली. मात्र यानंतरही पाकिस्तानी गोलंदाजांकडे ठरल्याप्रमाणे गोलंदाजी करण्याशिवाय इतर दुसरा प्लॅन नव्हता असं स्पष्टपणे दिसत होतं. पाकिस्तानी गोलंदाजांना प्रशिक्षण देणाऱ्या मॉर्नी मॉरकलनेही पाकिस्तानी गोलंदाजांना गोलंदाजीमधील पार्टनरशीप करता येत नाही, असं मान्य केलं. "मागील काही सामन्यांमध्ये आम्ही (गोलंदाजांची) पार्टरनशीप करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं की भारतामध्ये हे फार महत्त्वाचं आहे की दोन्ही बाजूने फलंदाजांवर दबाव निर्माण करता आला पाहिजे. स्टम्पवर गोलंदाजी करत राहिली पाहिजे. मात्र सध्या आमच्याकडून हे होताना दिसत नाही," असं मॉर्नी मॉरकलने म्हणालं आहे. 

नक्की वाचा >> 'शमी नमाज पठण करत नसेल का? मग तुम्हालाच मैदानात...'; पाकिस्तानी खेळाडू संतापला

वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...

पाकिस्तानी संघाला नसीम शाहची कमतरता जाणवतेय असंही मॉर्नी मॉर्कलने मान्य केलं. "तुम्ही आकडेवारी पाहिली तर नसीम शाह हा उत्तम गोलंदाज असल्याचं तुम्हाला दिसेल. त्याची सातत्यपूर्ण गोलंदाजी सामन्याच्या सुरुवातीला आम्हाला फायद्याची ठरते. तो सुरुवातीला शाहीनबरोबर उत्तम पार्टनरशीप करायचा. याचीच सध्या कमतरता जाणवते," असं मॉर्कलने म्हटलं. "आमच्या गोलंदाजीमध्ये सातत्य नाही. आम्हाला जर 19 नोव्हेंबरला ट्रॉफी (वर्ल्ड कप) उचलायची असेल तर आम्ही सातत्याने दोन्ही बाजूने गोलंदाजी करताना फलंदाजांवर तणाव निर्माण केला पाहिजे," असं मॉर्नी मॉर्कलने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'तो निव्वळ बावळटपणा!' विक्रमी खेळीनंतर मॅक्सवेल BCCI वर संतापत म्हणाला, 'मी डोळे झाकून...'

सध्या हॅरीस रौफ आणि हसन अली गोलंदाज म्हणून त्यांच्याकडून जी कामगिरी आवश्यक आहे ती गरजेनुसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत असंही मॉर्नी मॉर्कल म्हणाला आहे.