एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला अनेक अनपेक्षित गोष्टींचा सामना करावा लागला. भारतीय संघाचे आघाडीचे अनेक दिग्गज फलंदाज पहिल्या सामन्यात आपलं खातंही उघडू शकले नाहीत. इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाल्याने भारतीय फलंदाजीचा फज्जा उडाला होता. यामुळे एका क्षणी ऑस्ट्रेलिया संघ 200 धावा केल्यानंतरही सहज जिंकेल असं दिसत होतं. पण के एल राहुल आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांचा चुराडा केला आणि आपल्या दमदार फलंदाजीने भारतीय संघाच्या पहिल्या विजयाची नोंद केली. दरम्यान विराट कोहलीसह झालेल्या संभाषणादरम्यान के एल राहुलने कशाप्रकारे भारतीय संघाने तीन विकेट लागोपाठ गमावणं धक्कादायक होतं याचा खुलासा केला.
भारताचे आघाडीचे फलंदाज तंबूत पररतल्यानंतर के एल राहुल आणि विराट कोहली यांना कसोटी सामन्याप्रमाणे खेळावं लागलं होतं. विकेट जाऊ न देणं आणि संधी मिळेल तिथे धावा करणं याकडे त्यांचं लक्ष होतं. एकीकडे चौकार लगावताना दुसरीकडे सतत स्ट्राइक फिरवत राहण्यावर त्यांचा भर होता. यामुळे फायदा झाला असला तरी सामन्यानंतर आपण फार थकलो होतो अशी कबुली के एल राहुलने दिली आहे.
"मी खोटं बोलणार नाही, पण थकलो होतो. 50 ते 70 धावांची भागीदारी केल्यानंतर आता आपली ऊर्जा वाचवायला हवी इतकंच बोलणं झालं होतं. दोन धावांसाठी धावायला नको अशी चर्चा होती. आम्ही गॅपमध्ये शॉट लगावल्यानंतर आम्ही धावण्यास सुरुवात केली. वर्ल्डकपची सुरुवात विजयाने करणं हे चांगलं आहे," असं के एल राहुल म्हणाला.
के एल राहुलने यावेळी पहिल्या दोन ओव्हरमध्ये तीन विकेट जातील याची आपण काहीच कल्पना केली नव्हती असंही मान्य केलं. श्रेयस अय्यर मैदानात आल्यानंतर काही ओव्हर्स टीकेल असं वाटलं होतं. पण तोदेखील लवकर बाद झाल्याचं पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला असं त्याने सांगितलं.
They both got #TeamIndia the first win of #CWC23
As the bandwagon moves to Delhi, here's @imVkohli & @klrahul dissecting their match-winning partnership against Australia
P.S. The local lad is bracing himself for his homecoming
Watch the full interview … pic.twitter.com/HSXYovY43T
— BCCI (@BCCI) October 9, 2023
तो म्हणाला की "मी अपेक्षा केली नव्हती. जेव्हा चेंडू चांगले असतात तेव्हा तुम्ही नक्कीच काही विकेट गमावता. पण अशाप्रकारे नाही. यासाठी किमान 4 ते 5 ओव्हर लागतात. पण 1.5 किंवा 2 ओव्हर्समध्ये नक्कीच नाही. मी आंघोळ करुन बाहेर येऊन फक्त बसलो होतो. इशान बाद झाल्यानंतर मी पॅड बांधून तयारी सुरु केली होती. नंतर रोहित आणि श्रेयसही बाद झाले. मला वाटलं होतं श्रेयस किमान 2 ओव्हर मैदानात टिकेल. पण तो पहिल्याच की दुसऱ्या चेंडूवर बाद झाला".
दरम्यान विराटने भागीदारीबद्दल बोलताना सांगितलं की, "चेंडू कसा टोलवता येईल याकडे जास्त लक्ष होतं. आपल्या धावा आणि चेंडू याकडे पाहत नव्हतो. आम्ही अनुभव घेतलेल्या शारिरीक आव्हानांशी लढत होतो. दबाव असल्यास तुम्ही जास्त निराश होता आणि लवकर थकवा येतो. चेंडू टोलवणं आणि ओव्हरमध्ये 10 ते 15 धावा केल्याने आमच्यात चांगली भागीदारी झाली".
पुढे बोलताना के एल राहुलने आपण पहिल्या 10 ओव्हर्स कसोटी सामन्याप्रमाणे खेळण्याचं ठरवलं होतं असा खुलासा केला. तो म्हणाला की, "मी पहिल्या 10 ओव्हर्स कसोटी सामन्याप्रमाणे खेळायचं ठरवलं होतं. मी खुलेपणाने फलंदाजी करतो. चेंडू गोलंदाजांना मदत करणाऱ्या स्थितीत आम्ही याआधीही खेळलो आहोत. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियाचा मोमेंटम मोडण्याचं ठरवलं. त्यामुळे जेव्हा ते रडारबाहेर जात होते तेव्हा शिक्षा देत होतो"य