...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं?

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं.   

शिवराज यादव | Updated: Nov 4, 2023, 06:48 PM IST
...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं? title=

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जखमी हार्दिक पांड्या अद्यापही पूर्पणणे फिट नसल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात जागा देण्यात आली आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडमीत हार्दिक पांड्याची चाचणी घेतली असता अद्यापही तो दुखापतीमधून सावरला नसल्याचं समोर आलं. 

चाचणीत नेमकं काय झालं?

हार्दिक पांड्याला नेटमध्ये संपूर्ण ताकदीने गोलंदाजी करण्यास सांगण्यात आलं. यावेळी त्याला धीम्या गतीने तुझा वेग वाढवण्यास सांगण्यात आलं होतं. हार्दिक पांड्या दुखापतीमधून सावरत असल्याने त्याने पायावर जास्त जोर द्यावा अशी कर्मचाऱ्यांची इच्छा नव्हती. पहिल्या तीन चेंडूंवर हार्दिक पांड्याला कोणतीही समस्या जाणवली नाही. यानंत त्याने पुढील चेंडूवर तीव्रता वाढवण्याचं ठरवलं. चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याला पायात वेदना जाणवू लागल्या. 

पांड्याने सपोर्ट स्टाफला उजव्या पायाच्या घोट्यात वेदना होत असल्याचं सांगितलं. त्याने 80 टक्के तीव्रतेने पाचवा चेंडू टाकला असता वेदना आणखी वाढल्या. 

World Cup 2023: 'हार्दिक पांड्या संघात परतला तरी...', रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

यानंतर नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या वैद्यकीय पथकाने पुन्हा एकदा स्कॅन करण्याचं ठरवलं. "स्कॅन केला असता त्याच्या हाडाला अद्यापही सूज असून, अजून काही आठवडे लागणार असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर बीसीसीआयने संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला बदली खेळाडूची निवड करण्यास सांगितलं," अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली आहे.

शनिवारी सकाळी आयसीसीने हार्दिक पांड्या आता वर्ल्डकप खेळू शकणार नाही आणि त्याच्या जागी भारतीय बोर्डाने प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली असल्याची माहिती दिली.

पांड्या नेमका जखमी कसा झाला?

19 ऑक्टोबर रोजी पुण्यात झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये हार्दिक पांड्या जखमी झाला होता. बांगलादेशविरोधातील सामन्यात आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. तो साखळी फेरीमधील सामने खेळणार नाही असं आधी सांगण्यात आलं होतं. मात्र आज तो संपूर्ण स्पर्धेमधूनच बाहेर पडला असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

पांड्याची भावनिक पोस्ट

दरम्यान वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. मी आता वर्ल्डकप स्पर्धेचा भाग नाही ही गोष्ट पचवणं फार जड आहे असं हार्दिकने म्हटलं आहे. तसंच हा संघ विशेष असून सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

हार्दिकने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी आता उर्वरित वर्ल्डकपचा भाग नसेन ही गोष्ट पचवणं थोडं जड आहे. पण मी प्रत्येक चेंडूवर संघासाठी चिअऱ करत असेन. तुमच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार. हा संघ विशेष असून सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल".