World Cup 2023 : कोलकात्याच्या (KOLKATA) ईडन गार्डन्सवर (Eden Garden) होणाऱ्या विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup) पहिल्या सामन्यापूर्वीच एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमच्या बाहेरील भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या मैदानावर शनिवारी नेदरलॅंड विरुद्ध बांगलादेश असा सामना होणार आहे. मात्र त्याआधीच स्टेडिअमवर अपघाताची घटना घडली आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्याआधीच ही दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्टेडियमच्या बाहेरील भिंतीचा काही भाग मोठ्या मशीनच्या धडकेने कोसळला आहे. स्टेडिअमवर दुरुस्तीच्या कामादरम्यान हा अपघात झाला असल्याची माहिती मात्र, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अधिकाऱ्यांनी (Cricket Association of Bengal) दिली. लवकरात लवकर नुकसान झालेल्या भागाची दुरुस्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशीही माहिती क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोसळलेल्या भिंतीचा भाग हा गेट क्रमांक 3 आणि 4 मधला आहे. हा भाग स्टेडियममधील फ्लडलाइट टॉवर जवळ आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.
विश्वचषक 2023 चा पहिला सामना ईडन गार्डन्सवर शनिवारी नेदरलँड्स विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे. यानंतर मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना होणार आहे. 5 नोव्हेंबरला भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तर 11 नोव्हेंबरला इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. 16 नोव्हेंबरला ईडन गार्डन्सच्या मैदानावर उपांत्य फेरीचा सामनादेखील खेळवला जाणार आहे.
याआधी लागली होती आग
दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीच ईडन गार्डन्स स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान आग लागली होती. रात्री 11.30 वाजता ही घटना घडली. विश्वचषकासाठी स्टेडियममध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असताना ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे म्हटलं जात होतं. स्टेडियमवर असलेल्या ग्राउंड स्टाफला ड्रेसिंग रूममधून धूर येताना दिसला होता. या ड्रेसिंग रूमच्या बाहेरच नूतनीकरणाचे काम सुरू होते. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यात आली.