लंडन : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडने टीम इंडियाचा ३१ रननी पराभव केला. टीम इंडियाच्या या पराभवाचा धक्का पाकिस्तानलाही बसला. या मॅचमध्ये भारताचा विजय झाला असता तर पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचणं सोपं झालं असतं. यामुळे टीम इंडियाच्या पराभवामुळे पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनूस नाराज झाला आहे. वकार युनूसने टीम इंडियावर खिलाडूवृत्ती न दाखवल्याचा आरोप केला आहे.
'तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही आयुष्यात काय करता यावरच तुम्ही कोण आहात ते कळतं. पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचेल का नाही, याची मला चिंता नाही. पण एक गोष्ट पक्की आहे. काही चॅम्पियन्सच्या खेळ भावनेची परीक्षा घेतली गेली, यामध्ये ते खराब पद्धतीने अपयशी ठरले,' असं ट्विट वकार युनूसने केलं.
It's not who you are.. What you do in life defines who you are.. Me not bothered if Pakistan gets to the semis or not but one thing is for sure.. Sportsmanship of few Champions got tested and they failed badly #INDvsEND #CWC2019
— Waqar Younis (@waqyounis99) June 30, 2019
याआधी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासीत अली आणि सिकंदर बख्त यांनी आरोप केला होता की, पाकिस्तानला बाहेर ठेवण्यासाठी टीम इंडिया काही सामने मुद्दाम हरेल.
इंग्लंडने ठेवलेल्या ३३८ रनचा पाठलाग करताना भारताने ५० ओव्हरमध्ये ३०६/५ एवढा स्कोअर केला. शेवटच्या काही ओव्हरमध्ये धोनी आणि केदार जाधवने केलेल्या बॅटिंगवर सध्या सोशल मीडियावर टीका होत आहे. शेवटच्या काही ओव्हरमध्ये फटकेबाजी करण्याची गरज असतानाही केदार जाधव आणि धोनीला फोर आणि सिक्स मारता आले नाहीत. टीम इंडियाच्या संपूर्ण इनिंगमध्ये फक्त १ सिक्सचा समावेश होता. ही सिक्सदेखील धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये लगावली.
पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर आता भारतीय टीम ११ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर, न्यूझीलंड ११ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आणि इंग्लंडची टीम १० पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आता इंग्लंडला न्यूझीलंडचा पराभव करावा लागणार आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला आणि न्यूझीलंडने इंग्लंडला धूळ चारली तरच आता पाकिस्तान सेमी फायनलमध्ये प्रवेश करु शकेल.