साऊथम्पटन : २०१९ वर्ल्ड कपच्या टीम इंडियाच्या पहिल्याच मॅचमध्ये रोहित शर्माने झुंजार शतक झळकावलं. रोहित शर्माचं हे वनडे क्रिकेटमधलं २३वं शतक होतं. याचबरोबर रोहित शर्माने सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं आहे. वनडेमध्ये सौरव गांगुलीने २२ शतकं केली होती. सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत आता रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.
वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये ४९ शतकं केली आहेत, तर या यादीमध्ये विराट कोहली ४१ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्माने सौरव गांगुलीसोबतच श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचंही २२ शतकांचं रेकॉर्ड मोडलं. रोहितने आपल्या २०७व्या मॅचमध्ये २३वं शतक केलं. गांगुलीला एवढी शतकं करण्यासाठी ३११ मॅच आणि दिलशानला ३०० मॅच लागल्या होत्या.
वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित नवव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (४९ शतकं), विराट कोहली (४१ शतकं), रिकी पाँटिंग (३० शतकं), सनथ जयसूर्या (२८ शतकं), हाशिम आमला (२७ शतकं), एबी डिव्हिलियर्स, क्रिस गेल आणि कुमार संगकारा यांनी प्रत्येकी २५-२५ शतकं लगावली आहेत.
रोहित शर्माचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं हे तिसरं शतक होतं, तर वर्ल्ड कपमधलं दुसरं शतक होतं. याआधी २०१५ वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली होती.
वनडेमध्ये सर्वाधिक द्विशतकं लगावण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने वनडेमध्ये आत्तापर्यंत ३ द्विशतकं लगावली आहेत. रोहितने यातली दोन द्विशतकं श्रीलंकेविरुद्ध आणि एक द्विशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलं आहे. वनडेमध्ये सर्वाधिक स्कोअरचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध २०१४ साली २६४ रनची खेळी केली होती.