साऊथमप्टन : वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी जबरदस्त बॉलिंग केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेला ५० ओव्हरमध्ये २२७/९ एवढ्याच स्कोअरपर्यंत मजल मारता आली. भारताकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट घेतल्या असल्या तरी जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला धक्के दिले. हाशिम आमला आणि क्विंटन डिकॉक या दोन्ही ओपनरना जसप्रीत बुमराहने माघारी पाठवलं.
बुमराहने आमला आणि क्विंटन डिकॉकच्या विकेट घेतल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समनना त्रास दिला. बुमराहने १० ओव्हरमध्ये ३५ रन देऊन २ विकेट घेतल्या. तसंच २ ओव्हर मेडनही टाकल्या. बुमराहनं पहिल्या इनिंगनंतर त्याची रणनिती सांगितली. टेस्ट मॅचमध्ये ज्या टप्प्यावर बॉलिंग करतात, तशीच बॉलिंग मी या मॅचमध्ये केली, असं बुमराहने सांगितलं.
युझवेंद्र चहलने १० ओव्हरमध्ये ५१ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारला शेवटच्या ओव्हरमध्ये २ विकेट घेण्यात यश आलं. कुलदीप यादवलाही एक विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिकेकडून क्रिस मॉरिसने ३४ बॉलमध्ये सर्वाधिक ४२ रन केल्या, तर नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या कागिसो रबाडाने ३५ बॉलमध्ये नाबाद ३१ रन केले. मॉरिस आणि रबाडा यांच्यामध्ये ६६ रनची पार्टनरशीप झाली. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता.