World Cup 2019 : हाच तो क्षण, ज्यानं भारताची गच्छंती निश्चित केली

महेंद्रसिंह धोनीनं बाजू लावून धरत भारताची पडझड थांबवण्यात यश मिळवलं होतं, पण... 

Updated: Jul 11, 2019, 03:57 PM IST
World Cup 2019 : हाच तो क्षण, ज्यानं भारताची गच्छंती निश्चित केली  title=

नवी दिल्ली : बुधवारी मॅनचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा जोरदार झटका बसला. न्यूझीलंडनं भारतासमोर २४० रन्सचं आव्हान ठेवलं होतं. परंतु,  टीम इंडिया ४९.३ ओव्हरमध्ये २२१ रनवर ऑल आऊट झाली आणि टीम इंडियाला अवघ्या १८ रननी पराभव स्वीकारावा लागला. 

न्यूझीलंडनं समोर ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातच अत्यंत निराशाजनक झाली. रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल आणि दिनेश कार्तिक एकामागोमाग झटपट बाद झाले. पहिल्या दहा षटकांमध्येच भारताची अवस्था ४ बाद २४ रन अशी होती. यानंतर ऋषभ पंत (३२ रन) आणि हार्दिक पंड्या (३२ रन) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. सँटनरच्या फिरकीवर मोठा फटका मारण्याच्या नादात पंत झेलबाद झाला. यानंतर धोनीनं बाजू लावून धरत भारताची पडझड थांबवण्यात यश मिळवलं. त्यानं रवींद्र जाडेजाच्या साथीने शतकी भागीदारीही केली. जडेजाच्या फटकेबाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, शेवटच्या षटकांमध्ये हाणामारी करण्याच्या नादात जाडेजा आणि धोनी बाद झाले आणि भारताचा पराभव झाला. 

या सामन्यात धोनीने ७२ बॉलमध्ये ५० रन केले. पण ज्यावेळी त्याचा त्रिफळा उडाला त्याचवेळी भारताचा पराभव आणि न्यूझीलंडचा फायनलमध्ये प्रवेश निश्चित झाला होता. हाच क्षण आयसीसीनं आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवरून शेअर केलाय. 

सातव्या क्रमांकावर खेळायला मैदानात उतरलेल्या धोनीसमोर कमी चेंडूत जास्त धावांचं आव्हान होतं. त्यामुळेच रन काढण्याच्या प्रयत्नात चेंडू ठोकतानाच तो धावबाद झाला. याक्षणी पुढे काय घडणार? हे उमगल्यानं मॅच पाहणाऱ्या प्रेक्षक निराश झालेले पाहायला मिळाले.