सचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!

Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.

सौरभ तळेकर | Updated: Aug 13, 2023, 12:34 AM IST
सचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी! title=
Tiranga, 77th independence day cricketers helmet

Independence day, Tiranga On helmet: भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील तो सामना सर्वांनाच आठवत असेल, जेव्हा सचिनने वनडे सामन्यात 200 धावा करण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यावेळी सचिनने शांतपणे हेलमेट काढलं अन् हेलमेटवरील तिरंग्याला (Tricolour) नमन केलं, ज्याने कोणी हा सामना पाहिला असेल, त्याच्या डोळ्यासमोर हा क्षण उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच काय तर सौरव गांगुलीचे तिरंग्यातील तीन रंगाचे ग्लब्ज देखील सर्वांच्या लक्षात असतील. मात्र, तिंरग्याची (Tiranga) कहाणी नेहमी वादात कशी सापडली, त्याचा इतिहास नेमका काय आहे? याची माहिती पाहुया... (India celebrating 77th Independence Day)

ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. सचिनला त्याच्या हेल्मेटवर तिरंगा बीसीसीआयच्या (BCCI) लोगोच्या खाली ठेवल्याने टीकेचा सामना करावा लागला. कोर्टाने फटकारल्यानंतर सचिनने हेल्मेटवर तिरंगा बीसीसीआयच्या लोगोच्यावर लावून तिरंगा लावला. 

वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत या खेळाडूंनी देखील हेलमेटवर तिरंगा लावण्यास सुरूवात केली. मात्र, तुम्हाला माहितीये का? स्वत: भारत सरकारने टीम इंडियाच्या खेळाडूंना त्यांच्या हेल्मेटवर देशाचा तिरंगा घालण्यास मनाई केली होती. 2005 मध्ये बीसीसीआय (BCCI) आणि भारत सरकार यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर भारतीय खेळाडूंना त्यांच्या हेल्मेट, मनगटावर किंवा जर्सीवर कुठंही तिरंगा दाखवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर मोठा वाद पेटला. केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय ध्वज संहितेचा हवाला देत तिंरगा वापरण्यास मनाई केली होती. 

सरकारचा हा निर्णय सचिन आणि गांगुलीने मान्य केला. पण युवराज सिंगने ( Yuvraj Singh ) पंगा घेतला. तिरंगा न वापरणं हा त्याचा दृष्टीकोन आहे, परंतु हेल्मेटवर राष्ट्रध्वज घेऊन खेळण्याचा मला खूप अभिमान आहे, ही एक वेगळीच भावना आहे, असं म्हणत युवराजने नाराजी व्यक्त केली होती. तर इतर खेळाडू देखील पुढे येत नाराजी व्यक्त करू लागले. त्याचवेळी राज्यवर्धन सिंह राठौड यांनी देखील सरकारचा निर्णय योग्य नसल्याचं म्हटलं होतं. खेळाडूंच्या विरोधानंतर बीसीसीआयचे तत्कालीन उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं.

आणखी वाचा - Independence Day 2023: 'या' 7 देशभक्तीच्या गाण्यांवर बनवा ट्रेंडिंग इन्स्टाग्राम रील्स

राजीव शुक्ला यांनी गृह मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात अशोक चक्राशिवाय क्रिकेटपटू त्यांच्या गणवेशात राष्ट्रध्वजाचे तीन रंग वापरू शकतात का? याबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राजीव शुक्ला यांची भेट घेतली आणि क्रिकेटपटूंना तिरंगा वापरण्याची परवानगी दिली. तेव्हापासून क्रिकेटपटू त्यांच्या हेल्मेट किंवा ड्रेसवर अशोक चक्राशिवाय तिरंगा वापरू शकतात.

धोनीने का तिरंगा लावला नाही?

दरम्यान, 2011 साली धोनीने अखेरचा सिक्स खेचत फायनल जिंकवली. त्यावेळी त्याच्या हेलमेटवर भारताचा तिरंगा होता. मात्र, त्यानंतर धोनीने हेलमेटवर तिरंगा लावला नाही. सामन्याच्या मध्यभागी जेव्हा धोनी विकेटकीपिंग करताना हेल्मेट काढतो तेव्हा तो जमिनीवर ठेवतो. कायद्यानुसार राष्ट्रध्वज जमिनीवर ठेवता येत नाही, त्यामुळे धोनीने हेल्मेटवर तिरंगा लावणं बंद केलं होतं. धोनीवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. त्यानंतर त्याने तिरंगा न लावण्याचा निर्णय घेतला होता.