Who is Vishnu Vinod: गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना मुंबई इंडियन्सने 27 धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दमदार अर्धशतक ठोकलं. सूर्याच्या फलंदाजीबरोबरच सामन्यानंतर चर्चा झाली ती सूर्याला सोबत करणाऱ्या विष्णू विनोदची. विष्णूचे सूर्याला उत्तम साथ देत संयमी फटकेबाजी करत मुंबईचा स्कोअर 200+ पर्यंत जाईल याची काळजी घेतली. शेवटच्या काही षटकांमध्ये सूर्या आणि विष्णूने केलेल्या फटकेबाजीमुळेच मुंबईला सामाधानकारक धावसंख्या उभारुन सामना जिंकता आला. मात्र सूर्याला साथ देणारा विष्णू नेमका आहे तरी कोण हे अनेकांना ठाऊक नाही. त्यावरच टाकलेला प्रकाश...
शुक्रवारच्या सामना हा विष्णूचा आयपीएलमधील केवळ चौथा सामना होता. यंदा तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत असल्याचं त्याची फलंदाजी पाहून वाटत नव्हतं. त्याने 20 चेंडूंमध्ये 30 धावांची खेळी करत सूर्या तुफान फलंदाजी करत असताना दुसरी बाजू लढवली. 29 वर्षीय विष्णू हा घरगुती क्रिकेटमध्ये केरळच्या संघाकडून खेळतो. त्याने वयाच्या 20 व्या वर्षी 2014 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत तो पहिला टी-20 सामना लढला. आपल्या पहिल्याच सामन्यात विष्णू हा केरळकडून सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आणि हा सामना 20 धावांनी जिंकला. विष्णूच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 1,221 धावा आहेत. त्याने 33 च्या सरासरीने 140 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या. विष्णू हा एक उत्तम विकेटकिपरही आहे. त्याने घरगुती क्रिकेटमध्ये स्वत:च्या संघासाठी अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत.
2021-22 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने 26 चेंडूंमध्ये नाबाद 65 धावा केल्या होत्या. या खेळीमुळे केरळच्या संघाला तामिळनाडूविरोधात विजय मिळवता आला होता. याच पर्वामध्ये विष्णूने महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात नाबाद 100 धावा केल्या होत्या. त्याने सिजोमोन जोसेफबरोबर सातव्या विकेटसाठी विक्रमी पार्टनरशीप करताना यशस्वीपणे 292 धावांचा पाठला केला होता. याच सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राकडून खेळताना शतक झळकावलं होतं.
This six by Vishnu Vinod against Shami was fantastic. He really slapped that ball. #MIvGTpic.twitter.com/qxuQJ2Ar38
— Ishu (@PocketDynamoo) May 13, 2023
टी-20 मध्ये चांगली कामगिरी करुनही विष्णूला आयपीएलमध्ये पुरेशी संधी मिळाली नाही. गुजरातविरुद्धचा त्याचा सामना हा त्याच्या कारकिर्दीमधील चौथाच सामना होता. यापूर्वी त्याने 2017 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 3 सामन्यांमध्ये फलंदाजी केली होती. आरसीबीने के. एल. राहुल दुखापतग्रस्त असल्याने विष्णूला संघात स्थान दिलं होतं. गोव्यामध्ये खेळत असलेल्या विष्णूला अचानक बोलावून घेण्यात आलं. दोन दिवसांच्या ट्रायलनंतर आरसीबीने त्याला करारबद्ध केलं. दुर्देवाने या पर्वामध्ये त्याला 3 सामन्यांमध्ये एकेरी धावसंख्या करता आली. विष्णूने 73.07 च्या स्ट्राइक रेटने 19 धावा केल्या.
2021 मध्ये दिल्लीने विष्णूला करारबद्ध केलं. मात्र त्याला एकाही सामन्यात संधी देण्यात आली आहे. त्यानंतर त्याला सनरायझर्स हैदराबादने करारबद्ध केलं पण इथंही त्याला संघी मिळाली नाही. यंदाच्या म्हणजेच 2023 च्या पर्वातही विष्णूला संधी मिळाली नसती पण तिलक वर्मा जखमी झाल्याने त्याला संघात स्थान मिळालं. विष्णूला 20 लाखांच्या बेस प्राइजवर विकत घेण्यात आलं. त्याला गुजरातविरुद्ध तळाला खेळायला पाठवलं. विष्णूने सुर्याबरोबर 65 धावांची महत्त्वाची पार्टनरशीप केली.
विष्णूने 2021 च्या एका मुलाखतीमध्ये आपल्याला सारं काही फार कष्टाने मिळाल्याचं सांगितलं. केवळ सरावासाठी त्याला 60 किमीचा प्रवास करावा लागायचा. त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नासाठी कुटुंबियांना घरही विकावं लागलं. मात्र अशा परिस्थितीतही तो घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करुन मोठ्या स्तरावर संधी मिळेल याची वाट पाहत होता. गुजरातविरुद्दच्या सामन्यात त्याने स्वत:ला सिद्ध केल्यानंतर आता त्याला पुढेही संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.