'जर उद्या माझा मुलगा खेळला...', लाराने 'या' भारतीय खेळाडूचं घेतलं नाव; विशेष म्हणजे तो तेंडुलकर नाही

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं होतं. त्याने 11 सामन्यात 765 धावा ठोकल्या.   

शिवराज यादव | Updated: Dec 3, 2023, 01:44 PM IST
'जर उद्या माझा मुलगा खेळला...', लाराने 'या' भारतीय खेळाडूचं घेतलं नाव; विशेष म्हणजे तो तेंडुलकर नाही title=

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने उद्या जर आपल्या मुलाने क्रिकेट खेळायचं ठरवलं तर आपण त्याला कटिबद्धता आणि समर्पण यासाठी विराट कोहलीचं उदाहरण देऊ असं म्हटलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला असला तरी विराट कोहलीच्या फलंदाजीने मात्र सर्वांचं मन जिंकलं. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये अनेक रेकॉर्ड्सना गवसणी घातली. याच वर्ल्डकपमध्ये विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. 

विराट कोहलीच्या वर्ल्डकपमधील कामगिरीचं कौतुक करताना लाराने म्हटलं आहे की, "मला एक मुलगा आहे आणि उद्या जर त्याला एखादा खेळ खेळायचं असेल तर मी त्याला विराट कोहलीची कटिबद्धता आणि समर्पण यांचं उदाहरण देईन. फक्त त्याचं मनोबल वाढावं म्हणून नाही तर तो ज्या खेळात असेल तेथील एक नंबर खेळाडू व्हावा यासाठी मी विराटचं उदाहरण देईन".

ब्रायन लाराने यावेळी अनेकजण भारताने वर्ल्डकप गमावला असल्याने विराट कोहलीच्या योगदानाकडे दुर्लक्ष करतील असं म्हटलं. सांघिक यशात नेहमीच वैयक्तिक यशाचाही वाट असतो असं लारा म्हणाला. 

ब्रायन लाराने यावेळी विराटने क्रिकेटचा चेहरा बदलला आहे असं कौतुक केलं. तसंच एखादी व्यक्ती शिस्तीच्या आधारे खेळासाठी कशी तयारी करु शकतो हे दाखवून दिल्याचं म्हटलं आहे. 

"मला माहिती आहे की याआधीही अनेकांनी भारताने वर्ल्डकप जिंकला नसल्याने विराट कोहलीच्या चांगल्या कामगिरीला अर्थ नसल्याचं म्हटलं आहे. टीम स्पोर्ट म्हणजे जिंकणं आणि एक नंबर खेळाडू असताना तुमचंही तेच लक्ष्य असतं. पण सांघिक यशाची उपकंपनी म्हणजे वैयक्तिक यश असतं आणि हेच कोहलीने संपूर्ण विश्वचषकात भारतासाठी केलं आहे. कोहलीबद्दल मला सर्वात जास्त प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे त्याचा खरा वारसा, कारण त्याने क्रिकेटचा चेहरा बदलला आहे आणि तुम्ही खेळासाठी कशी तयारी करता हे दाखवून दिलं आहे. त्याच्याकडे असलेली शिस्त नेहमीच वेगळी असते," असं लारा म्हणाला आहे. 

क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 11 सामन्यांमध्ये 95.62 च्या सरासरीने तीन शतके आणि सहा अर्धशतकांसह 765 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 117 होती.

विराटने क्रिकेट विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करत 2003 च्या विश्वचषकातील सचिनच्या 673 धावांचा रेकॉर्ड मोडला. एकाच विश्वचषकात सर्वाधिक 50 हून अधिक धावसंख्येची नोंद करण्यातही त्याने सचिनला मागे टाकलं.

या वर्षी 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये, विराटने 72.47 च्या सरासरीने आणि 99 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 1377 धावा केल्या आहेत. त्याने 24 डावांमध्ये सहा शतके आणि 8 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 166 आहे.