मुंबईत मराठी भाषिक आमदारांची संख्या घटली, आवाज क्षीण होणार?

Marathi-speaking MLAs: 2024च्या निकालावर एक नजर टाकल्यास अमराठी आमदारांची मोठी यादी समोर येते.

Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2024, 09:23 PM IST
मुंबईत मराठी भाषिक आमदारांची संख्या घटली, आवाज क्षीण होणार? title=
मराठी आमदार

Marathi-speaking MLAs: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. महायुतीनं जोरदार मुसंडी मारलीये.मुंबईतील 36 मतदारसंघापैकी 22 मतदारसंघ महायुतीच्या तर 14 मतदारसंघात मविआचे उमेदवार विजयी झालेत. मात्र, मुंबईत मराठी भाषिक आमदारांची संख्या घटल्याचं समोर आलंय.

मुंबई म्हटलं की मराठी, हे एकेकाळचं समीकरण. जागतिक पातळीवर मुंबई ही मराठी माणसाची ओळख. मराठी अस्मितेचा मुंबईत मोठा लढा उभारला होता.मात्र आज याच मुंबईत मराठी आमदारांची संख्या घटल्याचं समोर आलंय. मुंबईत मराठी आमदारांची संख्या 23 वर आलीये.

2024च्या निकालावर एक नजर टाकल्यास अमराठी आमदारांची मोठी यादी समोर येते. यामध्ये मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, घाटकोपर पूर्वमधून पराग शाह, मुलुंडमधून मिहीर कोटेचा, चारकोपमधून योगेश सागर हे विजयी झाले. मुरजी पटेल यांचा विजय झाल्यानं गुजराती आमदारांची संख्या पाच झालीये.गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विद्या ठाकूर या विजयी झाल्या आहेत. तर बोरीवलीतून संजय उपाध्याय हे निवडून आल्यानं उत्तर भारतीय आमदारांची संख्या 2 झालीये..

सायन कोळीवाडा मतदारसंघातून कॅप्टन तमिळ सेल्वन यांचा विजय झाला आहे. ते मुंबईतले एकमेव दाक्षिणात्य आमदार आहेत.तर मुंबादेवीमधून अमिन पटेल, मालाड पश्चिममधून अस्लम शेख, मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमी, अणुशक्तीनगरमधून सना मलिक आणि वर्सोवा मतदारसंघातून हारुन खान या पाच मुस्लीम उमेदवारांनी विजय मिळवलाय.

2019 च्या निवडणुकीत अमराठी आमदारांची संख्या ही 11 होती.. 2024 मध्ये मुंबईतील 36 मतदारसंघापैकी 13 मतदारसंघात अमराठी उमेदवारी विजयी झालेत.यामध्ये भाजपकडे 8 मराठी तर 7 अमराठी भाषिक आमदार आहेत.त्याचप्रमाणे शिवसेनेकडे 5 मराठी, 1 अमराठी आमदार, राष्ट्रवादीकडे 1 अमराठी आमदार आहेत.सोबतच महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सर्वाधिक 9 मराठी तर 1 अमराठी आमदार आहेत.त्यासोबतच काँग्रेसकडे 1 मराठी, 2 अमराठी आमदार तर समाजवादी पक्षाकडे एकमेव अमराठी आमदार आहेत.

मराठी आमदारांची संख्या कमी झाल्यानं चर्चेचा विषय झालाय.. त्यामुळे मराठी माणूस टिकवणं आवश्यक असल्याचं मत सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलाय.महाराष्ट्राची मूळ भाषा मराठी मात्र देशाची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी भाषिक आमदारांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.त्यामुळे येणा-या काळात मराठी माणूस टिकवणं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधी असणं हे सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.अन्यथा विधिमंडळात मुंबईचा मराठी आवाज मात्र क्षीण होणार आहे.