वॉर्नर-स्मिथ नसणं भारताची चूक नाही- गावसकर

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली चौथी टेस्ट मॅच ड्रॉ झाली.

Updated: Jan 7, 2019, 02:14 PM IST
वॉर्नर-स्मिथ नसणं भारताची चूक नाही- गावसकर title=

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली चौथी टेस्ट मॅच ड्रॉ झाली. याचबरोबर भारतानं ४ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये २-१नं ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियामधला भारताचा हा पहिलाच टेस्ट सीरिज विजय आहे. या विजयानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला सुनावलं आहे. वॉर्नर आणि स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये नसणं ही भारताची चूक नाही. एवढंच वाटत होतं तर वॉर्नर आणि स्मिथचं ऑस्ट्रेलियानं कमी कालावधीसाठी निलंबन करायचं होतं. पण एका वर्षाची बंदी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला योग्य वाटली. खेळ भावना दुखावणाऱ्यांना अद्दल घडवून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला योग्य उदाहरण द्यायचं होतं, असं गावसकर म्हणाले.

ऑस्ट्रेलियानं जे खेळाडू दिले त्यांच्याविरुद्ध भारतानं सर्वोत्तम कामगिरी केली, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. मॅचनंतर सुनिल गावसकर सोनी सिक्सवर बोलत होते.

सध्याच्या खेळाडूंचा फिटनेस हा आधीच्या खेळाडूंपेक्षा चांगला आहे. आधीचे खेळाडू जिंकण्यासाठी खेळत नव्हते असं नाही. आम्हीही जिंकण्यासाठीच खेळायचो, पण सध्याचे खेळाडू आणि आधीचे खेळाडू यांच्या फिटनेसमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कर्णधार विराट कोहलीनंच भारतीय टीमला फिटनेसचा मार्ग दाखवल्याचं वक्तव्य गावसकर यांनी केलं.

टीम पेनचा रडीचा डाव

भारतीय टीममध्ये विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा नसते तर त्यांची अवस्थाही आमच्यासारखीच झाली असती, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननं केलं होतं.

स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांच्यासारखे महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये नसल्यामुळे आमच्या कामगिरीमध्ये सातत्य नाही. भारताच्या टीममध्ये विराट आणि पुजारा नसते तर त्यांनाही आमच्यासारख्या समस्येचा सामना करावा लागला असता. ऑस्ट्रेलियाच्या टीममधले काही खेळाडू नवीन आहेत. त्यांना टेस्ट क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. अनुभव असलेले आमचे खेळाडू परत आल्यानंतर दोन्ही टीममध्ये खऱ्या अर्थानं लढत होईल, असं टीम पेन म्हणाला होता. 

मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी तर बॅन्क्रॉफ्टचं ९ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं. बॅन्क्रॉफ्टनं सॅण्ड पेपरनं बॉल कुरतडला, पण डेव्हिड वॉर्नरनं त्याला यासाठी उचकवलं.