कोहलीचं हैदराबादमध्ये आणखी एक रेकॉर्ड, मिसबाहला मागे टाकलं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं ४५ रनची खेळी केली.

Updated: Oct 14, 2018, 11:04 PM IST
कोहलीचं हैदराबादमध्ये आणखी एक रेकॉर्ड, मिसबाहला मागे टाकलं title=

हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं ४५ रनची खेळी केली. याचबरोबर विराट आशियाचा सगळ्यात शानदार कर्णधार बनला. विराटनं २७ रन बनवले तेव्हा त्यानं पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकचं रेकॉर्ड मोडलं. मिसबाहचं रेकॉर्ड मोडत विराट ता सर्वाधिक रन करणारा आशियाई कर्णधार झाला आहे.

कर्णधार म्हणून विराटनं ४२ मॅचमध्ये ६५.१२ च्या सरासरीनं ४,२३३ रन केले आहेत. कोहलीनं टेस्ट क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत २४ शतकं केली आहेत. यामध्ये कर्णधार असताना १७ शतकं आहेत. मिसबाहनं ५६ मॅचमध्ये पाकिस्तानचं कर्णधारपद भुषवलं. ५१.३९ च्या सरासरीनं त्यानं ४,२१४ रन केले. मिसबाहनं या काळात ८ शतकं केली होती.

कोहली आशियातला सर्वाधिक रन करणारा कर्णधार झाला असला तरी जगातल्या कर्णधारांच्या यादीत कोहली आठव्या क्रमांकावर आहे. पण कर्णधार म्हणून कोहलीची सरासरी सगळ्या कर्णधारांमध्ये चांगली आहे.

या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅम स्मिथ पहिल्या क्रमांकावर आहे. स्मिथनं १०९ मॅचमध्ये ८,६५९ रन केले होते. ऑस्ट्रेलियाच्या अॅलन बॉर्डर यांनी ९३ मॅचमध्ये ६,६२३ रन केले. ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ७७ मॅचमध्ये ६,५४२ रन करणारा ऑस्ट्रेलियाचाच रिकी पॉटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराटनं २०१८ वर्षात टेस्ट क्रिकेटमधले एक हजार रन पूर्ण केले. यावर्षी हा टप्पा ओलांडणारा विराट पहिला खेळाडू ठरला आहे. वनडेमध्ये यावर्षी १ हजार रन करण्याचा रेकॉर्ड इंग्लंडचा विकेटकीपर जॉनी बेअरस्टोच्या नावावर आहे.