मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं भारतीय बॅट्समनचं कौतुक केलं आहे. खेळाडू फिट आहेत आणि त्यांच्यामध्ये रनची भूक आहे हे पाहून मला आनंद झाला. हैदराबादची मॅच बॅट्समनसाठी कठीण होती. राजकोटच्या तुलनेत इकडे पहिल्या इनिंगमध्ये आव्हानं होती. विराटनं पृथ्वी शॉचंही तोंड भरून कौतुक केलं. युवा खेळाडूंना खेळताना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, असं आम्हाला वाटत होतं. पृथ्वीनंही तसाच खेळ केला. इंग्लंडमध्येही नेटमध्ये आम्ही पृथ्वीची बॅटिंग बघितली होती. तिकडेही तो आक्रमक बॅटिंग करत होता. १८-१९ वर्षांचे असताना मी त्याच्या १० टक्केही नव्हतो, असं कोहली म्हणाला.
शार्दुल ठाकूर या मॅचदरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे उमेश यादवच्या १० विकेट महत्त्वाच्या ठरल्या, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये शॉनं शतक केलं. तर दुसऱ्या टेस्टमध्ये त्यानं ७० आणि नाबाद ३३ रनची खेळी केली. या कामगिरीमुळे शॉला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.