इंस्टाग्राम पोस्टमुळे कोहली 'विराट' अडचणीत! BCCI कारवाईचा इशारा देत म्हणाली, 'अशी गुप्त माहिती...'

Virat Kohli Yo Test Instagram Post: भारताचा स्टार फलंदाज असलेल्या विराटने गुरुवारी त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका स्टोरीची थेट बीसीसीआयने (BCCI) दखल घेतली आहे. विराटने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना थेट कारवाईचा इशारा दिला आहे. नेमकं घडलंय काय, विराटने काय शेअर केलं होतं पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 25, 2023, 10:35 AM IST
इंस्टाग्राम पोस्टमुळे कोहली 'विराट' अडचणीत! BCCI कारवाईचा इशारा देत म्हणाली, 'अशी गुप्त माहिती...' title=
विराटची ही इन्स्टाग्राम स्टोरी चांगलीच व्हायरल झाली

BCCI Warns To Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohali) हा सध्याच्या घडीला आघाडीच्या खेळाडूंपैकी एक आहे. जगभरामध्ये त्याचे लाखो चालहे आहेत. मात्र विराट कोहली हा मैदानावरील त्याच्या खेळाबरोबरच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. अगदी मैदानावरील आरडाओरड असो किंवा इतर काही विराट आणि वादाचं तसं नातं फार जुनं आहे. अशाच एका वादात विराट पुन्हा एकदा अडकला आहे. विराटने शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीवरुन हा वाद झाला आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीची थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दखल घेत विराटला ताकीद दिली आहे. 

नक्की काय होतं विराटच्या पोस्टमध्ये?

झालं असं की, विराटने गुरुवारी म्हणजेच 24 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला. हा विराटने काढलेला सेल्फी फोटो मैदानामधील आहे. यात विराट शर्टलेस बसला असून त्याने फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे तो अडचणीत सापडला आहे. विराटने या फोटोवर लिहिलेल्या कॅप्शनमध्ये 'यो यो टेस्ट संपवण्याचा आनंद' असं म्हणत 17.2 गुण मिळाल्याचं म्हटलं होतं. त्याने या कॅप्शनमध्ये स्मायली इमोजी आणि हिरव्या रंगाची बरोबरची खूण म्हणजे हे पास झालो अशा अर्थाची टीकमार्कही वापरली होती.

बीसीसीआयने दिला इशारा

'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीने शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम फोटोमुळे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी नाराज झाले आहेत. विराटने त्याच्या यो-यो टेस्टचा रिझल्ट शेअर केल्याने बीसीसीआयचे अधिकारी नाराज झाले आहेत. विराटने ही गुप्त माहिती शेअर केल्यानंतर तासाभरामध्ये बीसीसीआयच्या संघ व्यवस्थापनाने सर्व भारतीय क्रिकेटपटूंना नियमांचं कडेकोटपणे पालन करण्याचे निर्देश नव्याने दिले. हे तोंडी निर्देश देण्यात आले. विराटची इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल झाली. अनेक ठिकाणी याच्या बातम्याही झाल्या. त्यानंतर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खेळाडूंना यो-यो टेस्टच्या आकडेवारी सारखी गुप्त माहिती जाहीर न करण्याच्या सूचना दिल्याचं 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. 

कारवाई करु शकते बीसीसीआय

अशी माहिती सार्वजनिकरित्य शेअर करणाऱ्यांविरोधात बासीसीआय कारवाई करु शकते. विराटने यो-यो टेस्टमधील त्याचे गुण शेअर केल्यानंतर बीसीसीआयने तातडीने त्याची दखल घेतली. त्यानंतर खेळाडूंना इशारा देताना अशी गुप्त माहिती शेअर करु नये असंही सांगितलं आहे. अशी गुप्त माहिती शेअर करणं खेळाडू आणि बीसीसीआयदरम्यान झालेल्या कंत्राटाचं उल्लंघन आहे असंही सांगण्यात आलं असून हाच ठपका ठेऊन कारवाई केली जाऊ शकते असंही खेळाडूंना सांगण्यात आलं आहे. संघासंदर्भातील अशी गुप्त माहिती सार्वजनिकरित्या सोशल मीडियावरुन शेअर करण्याची परवानगी खेळाडूंना नसल्याचंही बीसीसीआयने दिलेल्या तोंडी इशाऱ्यामध्ये म्हटल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे. सरावाचे फोटो खेळाडू शेअर करु शकतात मात्र आकडेवारी आणि गुप्त माहिती शेअर करणं हे कंत्राटाचं उल्लंघन ठरतं.

यो-यो चाचणीमध्ये पंड्या, रोहितही पास

2 सप्टेंबर रोजी भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. यापूर्वी अलूरमध्ये 6 दिवसांच्या सराव शिबीरामध्ये सहभागी झाले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या कॅम्पच्या पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीची यो-यो टेस्ट झाली. याचनंतर विराटने ही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत यो-यो टेस्टचा स्कोअर सार्वजनिक केल्याने वाद निर्माण झाला आहे. विराटला थेट इशारा देण्यात आला आहे. भारताच्या या सरावामध्ये जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसनही सहभागी होणार आहेत.