बेस्ट बॉलर असशील घरी... आफ्रिदीच्या पहिल्याच बॉलवर अफगाणी खेळाडूचा सणसणीत Six; पाहा Video

Rahmanullah Gurbaz Six To Shaheen Afridi Viral Video: सध्या पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानचा संघ श्रीलंकेमध्ये एकदिवसीय मालिका खेळत असून या मालिकेतील दुसऱ्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 25, 2023, 09:18 AM IST
बेस्ट बॉलर असशील घरी... आफ्रिदीच्या पहिल्याच बॉलवर अफगाणी खेळाडूचा सणसणीत Six; पाहा Video title=
या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे

Rahmanullah Gurbaz Six To Shaheen Afridi Viral Video: आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेत सहभागी होणारे सर्वच संघ सध्या तयारी करत आहेत. भारतीय संघही नुकताच वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका खेळून परतला. दुसरीकडे सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये पाकिस्तानचा संघ एखाद्या दिवशी उत्तम खेळतो तर दुसऱ्या दिवशी एवढं वाईट खेळतो की त्यांच्या चाहत्यांची निराशा होतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेमधील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढली. संघातील वरिष्ठ खेळाडूंबरोबर जगातील आघाडीचा वेगवान गोलंदाज अशी ओळख असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीलाही अफगाणिस्तानच्या फलंदाजांच्या फटकेबाजीचा तडाखा बसला. आफ्रिदीला त्याच्या पहिल्याच चेंडूवर असा खणखणीत षटकार लगावला आहे की तो फार काळ त्याला लक्षात राहील.

227 धावांची पार्टनरशीप

अफगाणिस्ताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. नाणेफेक जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या कर्णधाराने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान या दोघांनी मिळून तब्बल 227 धावांची पार्टनरशीप केली. पाकिस्तानच्या गोलंदाजांना पाहिल्या 40 षटकांमध्ये एकही विकेट घेता आली नाही. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ हे तिन्ही गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. 

असा सणसणीत फटका मारला की...

जागतिक क्रिकेटमध्ये दबदाब असलेला आणि नुकताच 'द हंड्रेड' स्पर्धा गाजवून आलेला शाहीन शाह आफ्रिदी सपशेल फेल ठरल्याचं दिसून आलं. आफ्रिदीला अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाजने तर पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर पुलचा असा खणखणीत फटका मारला की चेंडू थेट सीमेपार जाऊन पडला. 16 चेंडूंमध्ये 7 धावांवर खेळत असलेल्या रहमानुल्लाहला आफ्रिदीने पहिलाच चेंडू थोडा शॉट पीच टाकला. मात्र चेंडू अखूड टप्प्याचा असेल याचा जणू काही अंदाज असल्याप्रमाणेच रहमानुल्लाह अगदी आत्मविश्वाने चेंडू लेग साईडला टोलावला. चेंडू बॅटच्या स्वीट स्पॉटला लागून थेट सीमेपार गेला. हा फटका पाहून समालोचकांनाही रहमानुल्लाह जणू या चेंडूची वाटच पाहत होता असं वाटलं. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. हा या मालिकेतील पहिला षटकार ठरला. रहमानुल्लाहने उत्तम संतुलन ठेवत चेंडू टोलावल्याने समालोचकांनाही त्याचं कौतुक केलं.

अवघा एक गडी राखून जिंकला सामना

अफगाणिस्तानच्या संघाने निर्धारित 50 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 300 धावा केल्या. पाकिस्तानच्या संघाने अगदी रोमहर्षक पद्धतीने हा सामना एक गडी आणि एक चेंडू राखून जिंकला. 3 सामन्यांची मालिका पाकिस्तानने 2-0 ने जिंकली.