मुंबई : टी-२० स्पर्धेच्या ११व्या सीझनमध्ये मुंबईला विजयाचा सूर गवसला. मंगळवारी घरच्या मैदानावर मुंबईने बंगळूरुला ४६ धावांनी हरवले. बंगळूरुचा कर्णधार विराट कोहली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला. त्याने ६२ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. या खेळीनंतरही त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला.
विराटच्या या खेळीसोबत तो या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटर बनलाय. विराटने सुरेश रैनाला मागे टाकत आतापर्यंत ४६१९ धावा केल्यात. रैनाच्या खात्यात ४५५८ धावा आहेत. याशिवाय या हंगामात सर्वाधिक धावा विराटच्या नावावर असल्याने त्याला ऑरेंज कॅप देण्यात आलीये.
दरम्यान, शेवटपर्यंत प्रयत्न करुनही विजय हाती न आल्याने विराट निराश झाला. सामन्यानंतर विराटने संघावर आपला राग काढला. विराट सामन्यानंतर म्हणाला, मुंबईसाठी ही चांगली मॅच होती. ऑरेंज कॅप घालण्याचे मन करत नाहीये. आता ऑरेंज कॅप घालण्याचा काही उपयोग नाहीये. आम्ही चांगली सुरुवात केली होती मात्र आम्ही आमच्या हाताने सामना गमावला. ज्याप्रमाणे आम्ही फलंदाज गमावले आम्ही सामना गमावला.
विराट पुढे म्हणाला, मुंबईला विजयाचे सारे श्रेय जाते. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्हाला कोणतीच संधी मिळाली नाही. आम्हाला जो एरिया चांगला वाटला आम्ही त्या एरियामध्ये गोलंदाजी केली मात्र आमच्यावर काऊंटर अॅटॅक झाला.