चेन्नई : भारताच्या अव्वल स्कॉवशपटू जोश्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लिकल यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जोश्ना आणि दीपिका यांना महिला दुहेरीच्या फायनलमध्ये हार पत्करावी लागल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पल्लिकलने सौरव घोषालसह मिश्र दुहेरीत ऐतिहासिक रौप्यपदकही मिळवले होते. जोश्ना आणि पल्लिकलने २०१४मध्ये झालेल्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
या राष्ट्रकुल स्पर्धत जोश्ना-दीपिकाला न्यूझीलंडच्या झोले किंग आणि अमांडा लँडर्स मर्फीकडून पराभव पत्करावा लागाल होता. त्यांना ११-९, ११-८ असे पराभूत व्हावे लागले.
दीपिका पल्लिकलने रौप्यपदक जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना म्हटले, शाबाश टीम इंडिया. Proud Husband. रात्री उशिरा दोघीही भारतात पोहोचल्या. मात्र भारतातील झालेले स्वागत पाहून दोघीही भारावून गेल्या.
मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये दीपिका आणि सौरव घोषाल या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, मॅच रेफ्रीनी घेतलेल्या निर्णयावर अनेक सवालही उपस्थित करण्यात आले.