शतक हुकलं, पण विराटनं गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं शानदार पुनरागमन केलं. 

Updated: Aug 19, 2018, 04:43 PM IST
शतक हुकलं, पण विराटनं गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं title=

नॉटिंगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं शानदार पुनरागमन केलं. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या जबाबदार खेळीमुळे पहिल्या दिवशी भारतानं ६ विकेट गमावून ३०७ रन केले. विराट कोहलीचं शतक फक्त ३ रननी हुकलं. विराटनं १५२ बॉलमध्ये ९७ रनची खेळी केली. तर रहाणे ८१ रनवर आऊट झाला. विराट आणि अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी १५९ रनची पार्टनरशीप केली. विराट कोहलीचं शतक जरी हुकलं असलं तरी त्यानं सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं आहे. भारतीय कर्णधार म्हणून परदेशामध्ये सर्वाधिक रन करण्याचं गांगुलीचं रेकॉर्ड विराटनं मोडलं.

विराट कोहलीनं आत्तापर्यंत परदेशामध्ये १६९४ रन केले आहेत तर गांगुलीच्या १६९३ रन होते. गांगुलीनंतर या यादीमध्ये धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्णधार असताना धोनीनं परदेशामध्ये १५९१ रन केले आहेत.

आदिल रशीदनं घेतली विकेट

टेस्ट क्रिकेटमध्ये विराट दुसऱ्यांदा नरवस नाईंनटीजचा शिकार झाला. याआधी  २०१३ साली जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहली ९६ रनवर आऊट झाला होता. आणि आता विराटनं आदिल रशीदच्या बॉलिंगवर स्लिपमध्ये उभा असलेल्या स्टोक्सला कॅच दिला. या दौऱ्यामध्ये रशीदनं कोहलीला चौथ्यांदा आऊट केलं आहे. रशीदनं वनडे सीरिजमध्ये विराटला दोनवेळा आऊट केलं होतं.