Maharashtra Weather News : केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं पश्चिमी हिमालय क्षेत्रामध्ये 23 जानेवारीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, उत्तर पश्चिम भारतातील मैदानी क्षेत्रांमध्ये 22 - 23 जानेवारी रोजी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील 48 तासांमध्ये उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानात किमान 2 अंश सेल्सिअसची वाढ अपेक्षित असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर मात्र तापमानात 2 ते 3 अंशांची घटही नाकारता येत नाही असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रातही तापमानाचा आकडा कमीजास्त फरकानं बदलताना दिसेल असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असलं तरीही राज्यात पुन्हा एकदा थंडीसाठी पूरक वातावरण निर्माण होत असून, किमान तापमानात घट अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. सातत्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं थंडीती तीव्रताही कमीजास्त दिसून येत असल्याचं या परिस्थितीत स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात सध्या पश्चिम घाट क्षेत्रात धुक्याची दुलई कायम राहणार असून, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळत ठिकाणी तापमान 10 अंशांहूनही कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
निफाड आणि धुळ्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार असून, कोकण क्षेत्रात मात्र उन्हाचा दाह कायम राहणार आहे. पुढील 24 तासांत कोकण किनारपट्टी क्षेत्र, मुंबई शहर आणि उपनगर तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये काही अंशी ढगाळ वातावरणही नाकारता येत नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.