मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : गेल्या काही वर्षांत जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकार भारतात रुजतोय. मुली या क्रीडा प्रकाराकडे करिअर म्हणून पाहायला लागल्यात. काही मुलींनी या क्षेत्रात दिमाखदार कामगिरी केलीय आणि आता एक पाऊल पुढे टाकत मुंबईतल्या काही मुली या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर पंचही झाल्यात.
रिदमिक जिमनॅस्टिक आता मुंबईत रुजू लागलंय... यामध्ये जिमनॅस्ट प्रशिक्षक वर्षा उपाध्याय यांचा मोठा वाटा आहे. माजी राष्ट्रीय खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या वर्ष उपाध्याय गेल्या अनेक वर्षांपासून रिदमिक जिमनॅस्टिकचं प्रशिक्षण देतात.
सध्या त्यांच्याकडे जवळपास २०० मुली सराव करतात. क्षिप्रा जोशी, सदिच्छा कुलकर्णी आणि अक्षदा शेट्ये या अंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवल्या. आता या तिघी जणी जिम्नॅस्टिकच्या पंच होतायत... त्यासाठी त्यांना वर्षा उपाध्याय मार्गदर्शन करतायत. नुकतीच या तिघींनी आंतरराष्ट्रीय रेफ्रीसाठी परीक्षा दिली. या सगळ्या जणींनी एकत्रच जिमनॅस्टिक खेळायला सुरुवात केली होती. नंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलं.
त्यांना शिवछत्रपती या राज्यातल्या प्रतिष्ठित पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. आता त्या मोठ्या आत्मविश्वासनं प्रशिक्षण देतात आणि पंच म्हणूनही काम करतात. यातूनच मुंबईत जिमनॅस्टिक या खेळासाठी एक चांगला पाया तयार होतोय. वर्षा उपाध्याय सध्या चार आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण देतात... तर त्यांनी घडवलेल्या मुली विविध केंद्रांवर आणि शाळेत जाऊन प्रशिक्षण देतात.
आपण ज्या खेळात खेळलो त्या खेळासाठी योगदान देण्याची इच्छा बहुतांश माजी खेळाडूंची असते. मात्र प्रत्येकाला ते शक्य होतच असं नाही. जिमनॅस्टिक्स खेळात कार्यरत असलेल्या या खेळाडूंकडे पाहिल्यावर भविष्यात मुंबईला जिमनॅस्टिक्समध्ये नक्कीच उज्वल भविष्य आहे.