जेव्हा अंपायरच नियम मोडतात तेव्हा...

खेळ हा नियमानुसारच खेळला जातो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अंपायरची असते.

Updated: Feb 15, 2019, 01:22 PM IST
 जेव्हा अंपायरच नियम मोडतात तेव्हा...  title=

मुंबई : कोणत्याही क्रीडाप्रकारात नियमांचे पालन निपक्षपाती पद्धतीने व्हावे यासाठी अंपायरची नेमणूक केली जाते. खेळ हा नियमानुसारच खेळला जातो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अंपायरची असते. अनेकदा कोणत्याही क्रीडाप्रकारासाठी प्रवेश घेतो तेव्हा एक सूचना आवर्जून सांगितली जाते की, अंपायरचा निर्णय अंतिम असेल. पण आता अंपायरनेच दुजाभाव केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात झाली. अंपायरने दिलेला निर्णय हा अंतिम असतो. पण अंपायरने दिलेल्या निर्णयाने गोलंदाज किंवा संघ समाधानी नसेल तर त्याला आव्हान देता येते. पण अंपायरच्या आडमुठेपणामुळे दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरला जीवनदान मिळाले. 

नक्की काय घडले

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामन्याच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. फर्नांडो हा गोलंदाजी करत होता. त्याने आपल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला हा एलबीडब्लू असल्याची अपिल अंपायरकडे केली. पण अंपायर अलीम दारने ती अपील रद्द ठरवली. यापुढील दोन बॉल टाकल्यानंतर डीन एल्गर हा कॅचआऊट असल्याची अपिल करण्यात आली. परंतू अंपायरने ही अपिल देखील नाकारली. अंपायरने झेलबाद असल्याची अपिल नाकारल्याने श्रीलंकेचा कर्णधार दिमुख करुणारत्नेने विकेटकीपर निरोशन डिकवेला झेलबाद झाला आहे का ? तुला बॅटला बॉल लागल्याचा आवाज आला का ? अशी चौकशी केली. किपरने सकारात्मक उत्तर दिल्याने कर्णधार करुणारत्नेने अंपायर अलीम दारच्या नाबाद असल्याच्या निर्णयाला आव्हान देत रिव्ह्यू मागितला. 

पण तुम्ही रीव्ह्यू घेऊ शकत नाही. आता वेळ निघून गेल्याचे अंपायरने सांगितले. जेव्हा या बॉलचा रिप्ले पाहिला तेव्हा टीम एल्गर आऊट असल्याचे निर्दशनास आले.  श्रीलंका संघ उपाहारासाठी गेला असता त्यांना एक गोष्ट लक्षात आली की कर्णधार करुणारत्नेने हा रीव्ह्यू वेळेच्या आत मागितला होता. पण अंपायर अलीम दारने वेळ निघून गेल्याचे सांगितले. अलीम दार यांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे सुपूर्द करण्याऐवजी त्यांनी श्रीलंकेची मागणी वेळेअभावी फेटाळली. त्यामुळे श्रीलंकेने वेळेत रीव्ह्यू मागून देखील अलीम दारच्या आडमुठेपणामुळे श्रीलंकेचे एक विकेटचे नुकसान झाले आणि दक्षिण आफ्रिकेला जीवनदान मिळाले.     

नियम काय सांगतो

अंपायरने दिलेला निर्णय समाधानकारक नसल्यास त्या निर्णायाला संबंधित संघाला किंवा गोलंदाजाला १५ सेंकंदांच्या आत आव्हान देता येते. असा नियम आहे.