मुंबई : आपल्या फिरकीच्या जादूने विरोधी संघाला घाम फोडणारा ऑस्ट्रेलिया संघाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, जर आमच्या वेळी कोहली खेळत असता तर, त्याने माझ्या गोलंदाजीचा चांगल्याच प्रकारे समाचार घेतला असता. शेन वॉर्नने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
वॉर्न म्हणाला की, माझ्या अंदाजानुसार विराट कोहलीने वयाच्या १५ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरु केले. ज्या वेळी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होतो, त्यावेळेस जर कोहलीदेखील आंतरराष्ट्रीय सामने खेळत असता तर, त्याने नक्कीच माझ्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली असती.'
'विराटचे क्रिकेटप्रतीचे समर्पण उल्लेखनीय आहे. विराट जेवढा फंलदाज म्हणून उत्तम आहे, तेवढाच तो चांगला कर्णधार देखील आहे. विराटच्या एकूणच कामगिरीमुळे मी त्याचा चाहता झालो आहे'. या शब्दत वॉर्नने कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
'सध्या टी-२० क्रिकेटची चलती आहे. ज्या प्रकारे विराट टी-२० मध्ये आक्रमकपणे खेळतो. त्याचप्रकारे विराट एकदिवसीय आणि कसोटी सामने देखील चांगल्या प्रकार खेळतो. क्रिकेटच्या प्रकारानुसार कोहली स्वत:च्या खेळात बदल करतो. म्हणूनच मला कोहलीबद्दल नितांत आदर आहे. एक खेळाडू म्हणून तुम्ही किती परिपूर्ण आहात याची प्रचिती ही कसोटी सामन्यातून दिसून येते.'
'कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाची परदेशातील कामगिरी ही उत्तम राहिली आहे. त्याने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिका जिंकवून देत मोठी विक्रमी कामगिरी केली.' असे देखील वॉर्न म्हणाला.