Team India: 'हे' तर फार हास्यास्पद....; पराभवानंतर सुनील गावस्करांची टीम इंडियावर टीका

Team India: सेंच्युरियन टेस्ट सामन्यात रोहित ब्रिगेडच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर चांगलेच संतापलेले होते. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 30, 2023, 10:23 AM IST
Team India: 'हे' तर फार हास्यास्पद....; पराभवानंतर सुनील गावस्करांची टीम इंडियावर टीका  title=

Team India: सेंच्युरियनमध्ये टीम इंडियाचा एक डाव आणि 32 रन्सने दारूण पराभव झाला. या पराभवनंतर टीम इंडिया आणि रोहित शर्मावर मोठ्या प्रमाणात टीका होतायत. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे सगळे फलंदाज जवळपास फेल गेले. के.एल राहुलशिवाय एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. या पराभवानंतर टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी देखील खेळाडूंचे कान टोचले आहेत. 

सेंच्युरियन टेस्ट सामन्यात रोहित ब्रिगेडच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर चांगलेच संतापलेले होते. गावस्कर म्हणाले की, पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी भारताने सराव सामना खेळायला हवा होता.

गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, पराभवाचं कारण स्पष्ट आहे कारण, याठिकाणी तुम्ही कोणताही सामना खेळला नाही. जर तुम्ही थेट सामना टेस्ट सामना खेळाल तर त्या गोष्टी योग्य पद्धतीने काम करणार नाहीत. 

टीम इंडियाने टेस्ट सिरीजपूर्वी इंट्रा-स्क्वॉड गेम खेळले होते. मात्र, हे टेस्ट सिरीजच्या तयारीसाठी पुरेसं नसल्याचं गावस्कर यांचं मत आहे. भारताने दक्षिण आफ्रिका ए टीमविरुद्ध सराव सामना खेळला असता, तर या परिस्थितीत ते अधिक सक्षम झाले असते, असंही ते म्हणालेत.

इंट्रा-स्क्वॉड गेम एक हास्यास्पद गोष्ट- गावस्कर

दक्षिण आफ्रिकेत आल्यानंतर तुम्हाला सराव सामने खेळण्याची गरज आहे. इंट्रा-स्क्वॉड सामने एक हास्यास्पद गोष्ट आहे. तुमचे वेगवान गोलंदाज तुमच्या फलंदाजांना वेगाने गोलंदाजी करतात का? ते बाऊन्सर टाकतील का कारण त्यांना त्यांच्या फलंदाजांना दुखापत होण्याची भीती असते, असंही गावस्कर यांचं म्हणणं आहे. 

दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल

पुरुषांच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान केपटाऊन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी मोहम्मद शमीच्या जागी आवेश खानची निवड केली आहे. आवेश खान दक्षिण आफ्रिकेविरोधातील एकदिवसीय मालिकेचा भाग होता. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 6 विकेट्स मिळवल्या होत्या. आवेशने 38 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 149 विकेट्स मिळवले आहेत. 

कशी असेल दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (विकेटकीपर), अभिमन्यु ईश्वरन, आवेश खान.