रोहितपेक्षा ट्रॅव्हिस हेडच भारी! मांजरेकरांचा दावा; म्हणाले, 'त्याची खेळी सर्वोत्तम कारण...'

Sanjay Manjrekar Mention Rohit Sharma Praises Travis Head: रोहित शर्माने सुपर 8 च्या सामन्यामध्ये 92 धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना हेडने भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकवला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 26, 2024, 02:19 PM IST
रोहितपेक्षा ट्रॅव्हिस हेडच भारी! मांजरेकरांचा दावा; म्हणाले, 'त्याची खेळी सर्वोत्तम कारण...' title=
सामन्यानंतर बोलताना व्यक्त केलं मत

Sanjay Manjrekar Mention Rohit Sharma Praises Travis Head: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या संजय मांजरेकर यांनी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमधील सुपर 8 च्या भारताच्या शेवटच्या सामन्यासंदर्भात केलेलं एक विधान चर्चेत आहे. मांजरेकर यांनी ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. सोमवारी, 24 जून रोजी झालेल्या या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून केवळ हेडला समाधानकारक कामगिरी करता आली. हेडने 46 बॉलमध्ये 76 धावांची खेळी केली. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

हेडने लगावले 9 चौकार, 4 षटकार

भारताने दिलेलं 206 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियन संघाला पेलवलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून केवळ हेडनेच फलंदाजीमध्ये चमक दाखवली. सेंट ल्युसिका येथील डेरेन सॅमी राष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना झाला ज्यामध्ये हेडने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. हेडच्या या कामगिरीचं मांजरेकरांनी कौतुक केलं आहे.

खरोखरच एका क्षणी हेड क्रिजवर असताना भारत एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याप्रमाणे टी-20 वर्ल्ड कपच्या स्पर्धेतही पराभूत होतो की काय अशी भीती भारतीय चाहत्यांना वाटू लागली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी विजयश्री खेचून आणला.

नक्की वाचा >> पाकिस्तानच्या मानगुटीवर 'त्या' 60 रुम्सचं भूत... अमेरिका दौरा आता भलत्याच कारणाने चर्चेत

यावरुनच तो स्पेशल असल्याचं दिसतं

"हेडची खेळी ही या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी आहे असं मी म्हणेन. मला ठाऊक आहे की रोहित शर्माने स्फोटक खेळी केली. मात्र हेडने मारलेले फटके अधिक सरस होते. कुलदीप यादवला ऑफ साईडला लाँग ऑफवरुन फ्लॅट बॅटने हेडने मारलेला फटका लाजवाब होता. हा एवढा कठीण फटका त्याने तणावामध्ये आपण केवळ एकटेच फलंदाज शिल्लक आहोत हे ठाऊक असतानाही मारला हे कौतुकास्पद आहे. त्याने ज्या पद्धतीची फटकेबाजी केली त्यावरुनच तो फार खास खेळाडू असल्याचं अधोरेखित होत आहे," असं मांजरेकर 'क्रिकइन्फो'शी केलेल्या चर्चेदरम्यान म्हणाले.

नक्की वाचा >> बाबरच काय युवराजलाही धोबीपछाड... Hitman रोहितने 92 रन्स करत मोडले 'हे' 10 मोठे विक्रम

हेडला या गोष्टीचा होतो फार फायदा; मांजरेकरांचा दावा

प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्याचा हेडला फायदा झाल्याचं निरिक्षण मांजरेकर यांनी नोंदवलं. "हेड 160 प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. टी-20 असो किंवा 50 ओव्हरचं क्रिकेट असो हा असा खेळाडू आहे जो बराच काळ मैदानात उतरुन टिकून खेळला आहे. मला ही खेळी फार आवडली आणि मला हेडबद्दल फार आदर वाटतो," असं मांजरेकर म्हणाले.

नक्की वाचा >> ..तर मी रोहित, विराटला टीम इंडियामधून बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलं

रोहितची दमदार खेळी

मांजरेकर यांनी हेडचं कौतुक करताना रोहितच्या खेळीचा उल्लेख केला. याच सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत 205 धावांपर्यंत मजल मारली. या 205 धावांमध्ये सर्वात मोठा वाटा भारताचा कर्णधार रोहित शर्माचा होता. भारतीय संघाच्या कर्णधाराने 41 बॉलमध्ये 92 धावांची तुफानी खेळी केली. अवघ्या 8 धावांनी त्याचं शतक हुकलं. रोहितने त्याच्या तुफान खेळीमध्ये 7 चौकार आणि 8 षटकार लगावले. कोणत्याही टी-20 वर्ल्ड कप सामन्यामध्ये एकाच खेळीत भारतीयाने लगावलेले हे सर्वाधिक षटकार ठरले.