T20 World Cup 2021: हार्दिक पांड्यावरुन बीसीसीआयमध्ये नाराजी! लवकरच टीम इंडियातून बाहेरचा रस्ता

केवळ हार्दिकच नाही तर वरुण चक्रवर्तीची निवडीवर देखील चर्चा सुरू आहे.

Updated: Nov 9, 2021, 04:40 PM IST
T20 World Cup 2021: हार्दिक पांड्यावरुन बीसीसीआयमध्ये नाराजी! लवकरच टीम इंडियातून बाहेरचा रस्ता title=

मुंबई : टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2021 मधून बाहेर पडताच, आता पराभवाच्या कारणांची सर्वत्र चर्चा होत आहे. टीम इंडियाने पहिल्या दोन सामन्यात खराब खेळ दाखवला, यात शंका नाही, पण बातम्यांनुसार, बीसीसीआयही संघ निवडीवरून प्रचंड नाराज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी-20 वर्ल्ड कप 2021 नंतर बीसीसीआय हार्दिक पांड्याच्या मुद्द्यावर अहवाल मागवणार आहे. केवळ हार्दिकच नाही तर वरुण चक्रवर्तीची निवडीवर देखील चर्चा सुरू आहे.

इनसाइड स्पोर्टच्या अहवालानुसार, 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर होणाऱ्या न्यूझीलंड मालिकेत हार्दिक पांड्याला संधी मिळणार नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीसीसीआय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांवर खूप नाराज आहे. दुखापती असूनही हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांची निवड हे बीसीसीआयच्या नाराजीचे कारण आहे.

हार्दिक पंड्या दुखापतीनंतरही आयपीएल खेळला

बीसीसीआयच्या अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याला श्रीलंका मालिकेनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये परतण्यास सांगण्यात आले होते, परंतु तरीही तो आयपीएल खेळला. एवढेच नाही तर पंड्या आणि वरुण चक्रवर्ती पूर्णपणे तंदुरुस्त नव्हते, पण तरीही निवडकर्त्यांनी त्यांची निवड केली. टीम इंडिया मॅनेजमेंटच्या सांगण्यावरूनच निवडकर्त्यांनी पंड्याची निवड केली आहे. त्यामुळे याप्रकरणी बीसीसीआय संघ व्यवस्थापनाकडून अहवाल मागवणार आहे.

वृत्तानुसार, BCCI हार्दिक पांड्याला T20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवेल आणि त्याच्या जागी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या मध्यमगती अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असेल. या शर्यतीत वेंकटेश अय्यर आघाडीवर आहे, जो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चेंडू आणि बॅटने जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने हार्दिक पांड्याला स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात समाविष्ट केले होते. चारपैकी 2 सामन्यात त्याने गोलंदाजी केली पण तो आपली जादू फारशी दाखवू शकला नाही.

त्याचवेळी वरुण चक्रवर्तीचाही खेळण्यासाठी तंदुरुस्त नसतानाही संघात समावेश करण्यात आला होता आणि त्याला 3 सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. गेल्या 9 वर्षांत पहिल्यांदाच टीम इंडिया कोणत्याही ICC टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहोचू शकली नाही.