यॉर्करकिंग लसिथ मलिंगाची टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती, सोशल मीडियावर केली घोषणा

श्रीलंकेचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगाने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे   

Updated: Sep 14, 2021, 07:01 PM IST
यॉर्करकिंग लसिथ मलिंगाची टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती, सोशल मीडियावर केली घोषणा title=

मुंबई : श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टी -20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मलिंगाने यापूर्वीच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मलिंगाने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

मलिंगा श्रीलंकेसाठी 30 कसोटी सामने, 226 एकदिवसीय आणि 84 टी -20 सामने खेळला आहे, ज्यात त्याने 546 विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगा शेवटचा टी -20 सामना मार्च 2020 मध्ये पल्लेकेले इथं वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. 

मलिंगाने 2011 मध्ये कसोटी आणि 2019 मध्ये वनडे फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मलिंगा टी -20 मध्ये 100 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. टी-20 मध्ये त्याने 5 वेळा 5 विकेट आणि 10 वेळा 4 विकेट घेतल्या आहेत.

सोशल मीडियावरुन केली घोषणा

मलिंगाने ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली. ट्विटमध्ये त्याने म्हटलं आहे, 'माझे टी 20 चे शूज भिंतीवर टांगून ठेवत आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे! माझ्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार, आता मी युवा क्रिकेटपटूंसोबत आपला अनुभव शेयर करणार आहे. 

मलिंगा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे आणि या लीगमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 

यावर्षी यूएई आणि ओमान इथं होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी श्रीलंकेने निवडलेल्या 15 जणांच्या संघात मलिंगाचा समावेश नाही. मलिंगाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर 2014 मध्ये पहिल्यांदा श्रीलंकेला टी -20 विश्वचषक जिंकून दिला होता.