2011 World Cup Final: "महेंद्रसिंग धोनीने IPL खेळतानाच नेटमध्ये मला...," तब्बल 12 वर्षांनी मुरलीधरनचा मोठा खुलासा

World Cup 2011: आगामी एकदिवसीय वर्ल्डकपच्या (World Cup 2023) वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कोणता संघ जेतेपद जिंकणार याकडे लक्ष लागलं आहे. भारतात वर्ल्डकप होत असल्याने भारतीय संघ पुन्हा एकदा 2011 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. यादरम्यान मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) महेंद्रसिंह धोनीसंबंधी (Mahendra Singh Dhoni) एक खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 30, 2023, 11:14 AM IST
2011 World Cup Final: "महेंद्रसिंग धोनीने IPL खेळतानाच नेटमध्ये मला...," तब्बल 12 वर्षांनी मुरलीधरनचा मोठा खुलासा title=

World Cup 2011: आगामी एकदिवसीय वर्ल्डकपच्या (World Cup 2023) वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने मंगळवारी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपमधील सर्व सामन्यांची ठिकाणं तसंच कोणते संघ भिडणार आहेत याची माहिती जाहीर केली. इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या सामन्यासह या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium) रणशिंग फुंकलं जाईल आणि क्रिकेटरसिक प्रतिक्षा करत असलेल्या या स्पर्धेला सुरुवात होईल. 

वर्ल्डकप सुरु झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार असून, चेन्नईत हा सामना पार पडेल. यानंतर दिल्लीत अफगाणिस्तान आणि त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी भारत आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. अहमदाबादमध्येच हा सामना होणार आहे. 

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) यांच्यासह बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि आयसीसीचे सीईओ ज्योफ अॅलार्डिस मुंबईच्या सेंट रेगिस हॉटेलमध्ये उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत वर्ल्डकपच्या सामन्यांची घोषणा करण्यात आली होती.

या कार्यक्रमात मुरलीधरनला 2011 वर्ल्डकपमधील फायनलसंबंधी त्याच्या आठवणी, मतं मांडण्यास सांगण्यात आलं. मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये भारत आणि श्रीलंकेत अंतिम सामना पार पडला होता. यानंतर त्याला महेंद्रसिंग धोनीसंबंधी (Mahendra Singh Dhoni) विचारण्यात आलं. या सामन्यात धोनी फॉर्ममध्ये असणाऱ्या युवराज सिंगच्या आधी फलंदाजीसाठी आला होता. 

मुरलीधरनने यावेळी धोनी फलंदाजीसाठी आधी आल्याने आपल्याला आश्चर्य वाटलं नाही, कारण युवराजला आपल्याविरोधात खेळताना जास्त संघर्ष करावा लागत होता असा खुलासा केला. आणि भारताला आणखी विकेट्स गमवायच्या नव्हत्या. कारण 275 धावांचा पाठलाग करताना भारताची स्थिती 114 वर 3 गडी बाद अशी होती. यानंतर धोनी फंलदाजासाठी मैदानात उतरल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 

मुरलीधरनने सांगितलं की, धोनीला माझ्याविरोधात जास्त आत्मविश्वासाने खेळू शकत होता. मी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना नेटमध्ये त्याने माझ्या गोलंदाजीचा सामना केला होता. यामुळे त्याला आत्मविश्वास वाटत होता. 

"युवराज सिंग त्यावेळी वर्ल्डकपमधील मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाज होता. पण तो माझ्याविरोधात चांगला खेळू शकत नाही याची मला माहिती होती. मी आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत असताना धोनीने नेटमध्ये माझ्या गोलंदाजीविरोधात फलंदाजी केली होती. त्यामुळे तो मला चांगला ओळखून होता. मला विकेट मिळू नये यासाठी त्याचा प्रयत्न होता. मला असंही चांगली गोलंदाजी करुनही विकेट मिळालेल्या नव्हत्या," असा खुलासा मुरलीधरनने केला. 

"मैदानात त्यावेळी फार दव होतं आणि त्यामुळे चेंडू फिरत नव्हता. दुसऱ्या बाजूला गंभीर खेळत होता. त्यामुळे जेव्हा विकेट पडली तेव्हा आता धोनी फलंदाजीसाठी येणार हे मला माहिती होतं. कारण त्याला माझ्याविरोधात कसं खेळायचं हे माहिती होतं," असंही त्याने सांगितलं.

मुरलीधरनने अंतिम सामन्यात 8 ओव्हर्स टाकल्या होत्या. ज्यामध्ये त्याने 5 पेक्षाही कमी धावांच्या सरासरीने फक्त 39 धावा दिल्या होत्या. दुसरीकडे धोनीने वर्ल्डकप जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने 79 चेंडूत 91 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यामधील एक षटकार हा विजयी फटका होता. जो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाला आहे.