Ind vs SA भारतीय संघाच्या दौऱ्याआधी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सध्या कोरोनाचं संकट कायम आहे. 

Updated: Dec 2, 2021, 09:45 PM IST
Ind vs SA भारतीय संघाच्या दौऱ्याआधी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी कोरोनामुळे स्पर्धा पुढे ढकलली आहे. भारताचा अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे, तर वरिष्ठ संघ 9 डिसेंबरला तेथे पोहोचणार आहे, मात्र ओमिक्रॉन व्हायरसच्या संसर्गामुळे हा दौरा अडचणीत सापडला आहे.

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सध्या कोरोनाचं संकट कायम आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिका होणार की नाही हे अजून निश्चित नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप या प्रकरणी कोणताही निर्णय घेतला नसला तरी आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) देखील बीसीसीआयला खेळाडूंची सुरक्षा आणि बायो-बबलचे आश्वासन देत आहे.

आफ्रिकेत कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे आफ्रिकन बोर्डाने आपल्या देशांतर्गत स्पर्धेचे सामने पुढे ढकलले आहेत.

दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी, 2 डिसेंबर रोजी एक निवेदन जारी करून सांगितले की, विभाग-2 CSA चार-दिवसीय देशांतर्गत मालिकेतील सर्व सामने पुढे ढकलण्यात येत आहेत. हे सामने गुरुवारपासूनच सुरू होणार होते, मात्र सहभागी संघांमध्ये संसर्गाची काही प्रकरणे समोर आली, त्यामुळे आफ्रिकन बोर्डाला हा निर्णय घ्यावा लागला. ही स्पर्धा कोणत्याही प्रकारच्या बायो-बबलमध्ये खेळवली जात नव्हती. त्यामुळे CSA ने हे सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

सीएसएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की सामना सुरू होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीत ही संक्रमित प्रकरणे समोर आली आणि अशा परिस्थितीत हा निर्णय कोविड प्रोटोकॉल अंतर्गत घेण्यात आला.