Wedding Invitation Whatsapp Scam: तुळशीच्या लग्नानंतर लग्न सोहळ्यांची रेलचेल सुरु होणार आहे. हल्ली प्रत्यक्षात पत्रिका देण्याऐवजी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमंत्रण पत्रिका पाठवली जाते. व्हॉट्सअपवरुन आमंत्रण देणं हे अधिक सोयीस्कर, वेळ आणि पैसे दोन्ही वाचवणारं आहे. छापील पत्रिका वाटण्यासाठी वेळही अधिक जातो आणि पैसेही अधिक खर्च होतात. मात्र आता हे माध्यमही सायबर चोरांच्या निशाण्यावर आलं असून या माध्यमातून आता फसवणूक केली जात आहे. सामान्य वाटणाऱ्या लग्नाच्या व्हॉट्सअप आमंत्रणांच्या माध्यमातून फोनमधील डेटा आणि त्या माध्यमातून बँक अकाऊंट साफ केली जाऊ शकतात.
हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सायबर गुन्हेगार व्हॉट्सअपवरुन लग्नाच्या आमंत्रणांच्या माध्यमातून एपीके फाइल्स पाठवत आहेत. लग्नाची पत्रिका ही डॉक्युमेंट फॉरमॅटमध्ये आल्याचं समजून ती डाऊन लोड केल्यानंतर फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होतो. या मालवेअरच्या माध्यमातून या सायबर गुन्हेगारांना फोनमधील सर्व डेटा मिळतो वर ते अन्य ठिकाणी बसून नियंत्रण मिळवू शकतात. हा मालवेअर समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये सक्रीय झाल्यानंतर हॅकर्स अशा डिव्हाइजमधील मेसेज, फोन कॉल रेकॉर्ड मॅनेज करु शकतात. या माध्यमातून त्या युझरचा खासगी डेटा या हॅकर्सला चोरता येतो. या माध्यमातून ते खंडणीही वसूल करु शकतात. मात्र आपल्या नावाने पैसे मागितले जात आहेत याची कल्पनाही युझरला नसते.
व्हॉट्असअप मेसेजच्या माध्यमातून फसवणुकीला सुरुवात होते. अनोखळी क्रमांकावरुन लग्नाचं आमंत्रण दिलं जातं. यामध्ये दिसणारी फाइल ही आमंत्रण पत्रिकेसारखी दिसते. पण ही फाइल म्हणजे एपीके फाइल असते. हे वर वर दिसणारं आमंत्रण मात्र खऱ्या प्रत्यक्षात एपीके डाऊनलोड केल्यानंतर या धोकादायक अॅप्लिकेशनच्या माध्यमातून खासगी माहिती चोरली जाते. पासवर्ड, बँकेचे व्यवहार यासारख्या गोष्टींवर नजर ठेवली जाते.
नक्की वाचा >> 'या' भारतीय कंपनीचे 500 कर्मचारी झाले कोट्याधीश! 70 जणांना मिळाले प्रत्येकी 8.5 कोटी रुपये
काही प्रकरणांमध्ये युजरला कल्पना नसतानाही त्याच्या मोबाईल क्रमांकावरुन त्याच्या कॉनटॅक्ट लिस्टमधील लोकांना मेसेज पाठवले जातात. या मेसेजमध्ये तातडीने आर्थिक मदत असल्याचं सांगितलं जातं. या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक होऊ शकते. याचा फटका केवळ युझर्सलाच नाही तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनाही बसू शकतो.
अशाप्रकारे अनोळखी क्रमांकावरुन येणारी कथित आमंत्रण डाऊनलोड करु नयेत. फारच शंका असल्यास हे क्रमांक कोणाचे आहेत याबद्दलची माहिती काही अधिकृत अॅप्लिकेशनच्या माध्यमातून घ्यावी. घरातील वयस्कर व्यक्ती किंवा 60 वर्षांवरील व्यक्ती व्हॉट्सअप वापरत असतील तर त्यांना अशी फसवणूक होतो याची कल्पना देऊन ठेवावी.