बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी मोहम्मद शमीचं दमदार कमबॅक, पहिल्याच सामन्यात तब्बल 4 विकेट्स घेण्यात यश

मोहम्मद शमीने पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात दमदार परफॉर्मन्स दाखवल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. 

पुजा पवार | Updated: Nov 14, 2024, 03:58 PM IST
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी मोहम्मद शमीचं दमदार कमबॅक, पहिल्याच सामन्यात तब्बल 4 विकेट्स घेण्यात यश title=
(Photo Credit : Social Media)

Mohammad Shami : भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर दुखापतीमुळे त्रस्त असलेला मोहम्मद शमी (Mohammad Shami) तब्बल 360 दिवस क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. मात्र आता शमी बरा होऊन त्याने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यात पुनरागमन केले आहे. यात बंगलाकडून खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात मध्यप्रदेशच्या एकूण 4 विकेट्स घेतल्या. शमीने पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात दमदार परफॉर्मन्स दाखवल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. 

मध्य प्रदेशातील होळकर स्टेडियमवर बंगाल विरुद्ध मध्यप्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला जात आहे. मागील जवळपास वर्षभर दुखापतग्रस्त असलेला मोहम्मद शमीने या सामन्यातून पुनरागमन केलं आहे. शमीच्या शानदार गोलंदाजीमुळे बंगालने अवघ्या 59 ओव्हर्समध्ये मध्यप्रदेशच्या संघाला 167 धावांवर सर्वबाद केले. बंगालने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना 228 धावा केल्या. मात्र त्यासमोर मध्यप्रदेश केवळ 167 धावाच करू शकला. त्यामुळे बंगालची 61 धावांची आघाडी कायम राहिली. मध्यप्रदेशची पहिली इनिंग सुरु असताना बंगालच्या गोलंदाजांपैकी शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर त्याच्या खालोखाल सुरज जयस्वाल आणि मोहम्मद कैफने प्रत्येकी 2 तर रोहित कुमारने 1 विकेट घेतली. शमीने शुभम शर्मा, सारांश जैन, कुमार कार्तिकेय, कुलवंत खेजरोलिया या फलंदाजांना बाद केले. 

मोहम्मद शमीचं जबरदस्त पुनरागमन : 

मोहम्मद शमीने भारतात झालेल्या वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियासाठी महत्वपूर्ण योगदान दिले होते. या वनडे वर्ल्ड कपमध्ये शमीने 24 विकेट्स घेतले. यात त्याचा सर्वोत्कृष्ट परर्फोर्मन्स सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमी फायनल सामन्यात शमीने एकट्याने टीम न्यूझीलंडच्या 7 विकेट्स घेतल्या होत्या. यातही त्याने फलंदाजांना 9.5 ओव्हर टाकून फक्त 57 धावा दिल्या. ही 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप सामन्यात भारतीय गोलंदाजाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र यादरम्यान शमीच्या पायाला दुखापत झाली होती ज्याच्यावर वर्ल्ड कप संपल्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. त्यामुळेच शमी काही महिने क्रिकेटपासून दूर होता.  

हेही वाचा : अर्जुन तेंडुलकर 'मुंबई' सोडणार? 2022 मध्ये 'गुजरात'ने दाखवलेला इन्ट्रेस्ट; अखेर MI ने मोजलेली 'इतकी' रक्कम

 

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर होईल पर्यंत मोहम्मद शमी पूर्णपणे बरा झाला नव्हता. त्यामुळे 22 नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी त्याचे टीम इंडियात सिलेक्शन होऊ शकलं नाही. कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते की शमी 100 टक्के बरा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे आम्ही अनफिट शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊ इच्छित नाही असे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे टीम इंडियात पुनरागमनासाठी शमीला अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते.