दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान त्यांच्या जागी तरुण खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांना संधी देण्यात आली आहे. पुजारा आणि रहाणे वगळता इतर भारतीय खेळाडूंना संघात स्थान मिळवण्यात यश मिळालं आहे. संघ निवडकर्त्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल भारताचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला विचारण्यात आलं असता त्याने नवीन खेळाडूंना संधी देण्याची ही योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे. खेळ हा कधीच कोणाबरोबर आयुष्यभर राहत नाही. रहाणे आणि पुजारा यांनी भारतीय संघासाठी भरीव योगदान दिलं आहे. आता नवीन फलंदाजांना संधी देण्याची वेळ असून त्यांनीही स्वत:ला सिद्ध करण्याची वेळ आली आहे असं सौरव गांगुलीने सांगितलं आहे.
"एका क्षणी तुम्हाला नव्या कौशल्याला संधी द्यावी लागते. भारताकडे अनेक कौशल्यवान खेळाडू असून, संघाने प्रगती करणं आवश्यक आहे. पुजारा आणि रहाणे यांनी संघाला फार यश मिळवून दिलं. पण खेळ तुमच्यासोबत आयुष्यभर राहत नाही," असं सौरव गांगुली म्हणाला आहे.
"तुम्ही कायमचे तिथे असू शकत नाही. प्रत्येकाला कधी ना कधी अशा स्थितीचा सामना करावा लागणार आहे. पण त्यांनी भारतीय संघासाठी जे केलं आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानायला हवेत. पण आता निवडकर्त्यांना नवीन चेहरे हवे आहेत," असं सौरव म्हणाला.
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा अनेक काळापासून भारतासाठी कसोटी खेळत आहेत. अजिंक्य रहाणेने 85 सामन्यात 38.46 च्या सरासरीने 5077 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजविरोधात जुलै महिन्यात त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. तसंच चेतेश्वर पुजाराने 103 सामन्यांमध्ये 43.60 च्या सरासरीने 7195 धावा केल्या आहेत. जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला.
वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये 89 धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कदाचित चेतेश्वर पुजारासोबत शेवटची टेस्ट खेळली असेल.
"अजिंक्य रहाणे आणि पुजाराची जागा आता के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी घेतली आहे. तसंच गिल हा मधल्या फळीत खेळेल आणि यशस्वीला फार संधी आहे," असं एका सूत्राने पीटीआयशी बोलताना म्हटलं.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (व्हीसी), प्रसिद्ध कृष्णा.