लाहोर : सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. २३ ऑक्टोबरला गांगुली अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारेल. गांगुलीच्या या नव्या भूमिकेसाठी सीमेपलीकडून शोएब अख्तरने शुभेच्छा दिल्या आहेत. गांगुलीने कर्णधार झाल्यानंतर भारतीय क्रिकेट बदललं आता अध्यक्ष झाल्यानंतरही असेच बदल होतील, असं शोएब म्हणाला आहे. एवढच नाही तर शोएबने गांगुलीची तुलना इम्रान खानशी केली आहे.
शोएब अख्तर आयपीएलमध्ये कोलकात्याकडून गांगुलीच्या नेतृत्वात खेळला आहे. कठीण काळामध्ये गांगुलीने खेळाडूंना साथ दिली आणि त्यांची मानसिकता बदलली. त्याने भारतीय क्रिकेटमध्येही बदल केले कारण त्याच्याकडे चांगलं ज्ञान आहे, अशी स्तुती शोएबने केली.
शोएब अख्तरने सौरव गांगुली आणि पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांची तुलना केली. या दोघांची नेतृत्व शैली एकसारखी आहे. सौरवचे नेतृत्व गूण इम्रानसोबत जुळतात. आमच्या पंतप्रधानांकडेही हे गूण आहेत आणि सौरवकडेही, असं शोएब म्हणाला.
आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना शोएबने सांगितलं, 'भारतीय क्रिकेटमध्ये गांगुलीमुळेच बदल आला. १९९७-९८ मध्ये भारत कधी पाकिस्तानला पराभूत करेल, असं मला वाटलं नव्हतं. भारताकडे तशी सिस्टिमचं नव्हती, असं मला वाटायचं, पण सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलून टाकली.'
'सौरव गांगुली मला घाबरायचा, असं अनेकांना वाटतं. त्याला माझ्या बॉलिंगवर हुक आणि पूल मारताना अडचण यायची, पण तो मला घाबरायचा हे बोलणं चुकीचं ठरेल. जर असं असतं, तर त्याने माझ्याविरुद्ध ओपनिंगला बॅटिंग केली नसती', अशी प्रतिक्रिया शोएबने दिली.