आयपीएलमध्ये शिखर धवन मुंबईच्या ताफ्यात येणार?

आगामी आयपीएलसाठी मुंबईच्या टीमनं जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.

Updated: Oct 21, 2018, 05:58 PM IST
आयपीएलमध्ये शिखर धवन मुंबईच्या ताफ्यात येणार? title=

मुंबई : आगामी आयपीएलसाठी मुंबईच्या टीमनं जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आधीच्या आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक मुंबईच्या टीममध्ये दाखल झाला आहे. तर हैदराबादच्या शिखर धवनला मुंबईच्या टीममध्ये घेण्याचा जोरदार प्रयत्न मुंबईचं संघ व्यवस्थापन करत आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्रानं याबाबत बातमी दिली आहे.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार शिखर धवनला हैदराबादसोबत खेळण्याची इच्छा नाही. मागच्या आयपीएलवेळी त्याचे आणि हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी यांचे मतभेद झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिखर धवननं आपल्याला करारमुक्त करण्याची मागणी हैदराबादकडे केली आहे. शिखर धवन मुंबईकडून खेळला तर भारतासाठी वनडे आणि टी-२०मध्ये ओपनिंग करणारे रोहित शर्मा-शिखर धवन मुंबईच्या टीमकडून खेळताना दिसतील.

क्विंटन डी कॉक मुंबईकडे

बंगळुरूनं क्विंटन डी कॉकला २.८ कोटी रुपयांना मुंबईला विकलं आहे. याच किंमतीला बंगळुरूनं डी कॉकला लिलावात विकत घेतलं होतं.

क्विंटन डी कॉकला टीममध्ये घेतल्याच्या बदल्यात मुंबईनं बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमान (२.२ कोटी रुपये) आणि श्रीलंकेचा ऑफ स्पिनर अकिला धनंजया (५० लाख रुपये) यांना सोडून दिलं आहे. मुंबईच्या टीममध्ये सध्या इशान किशन, आदित्य तरे हे दोन विकेट कीपर आहेत.

क्विटंन डी कॉक दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूकडून खेळला आहे. आयपीएलच्या ३४ मॅचमध्ये त्यानं २८.०९ ची सरासरी आणि १३० च्या स्ट्राईक रेटनं ९२७ रन केले आहेत. यामध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.

१५ नोव्हेंबर ही आयपीएलच्या टीमना खेळाडूंना सोडण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी सगळ्याच फ्रॅन्चायजी त्यांच्या टीममध्ये बदल करताना दिसतील. याची पहिली सुरुवात मुंबईनं केली आहे.