मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) 27 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने चौथ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई मुंबईनंतरची सर्वात यशस्वी टीम राहिली आहे. धोनीच्या नेतृत्वात विजेतेपद मिळवण्याची चेन्नईची चौथी वेळ ठरली. धोनीचं कर्णधार आणि खेळाडू म्हणून हा अखेरचा मोसम असल्याचं म्हंटलं जात आहे. त्यामुळे भविष्यात धोनीनंतर चेन्नईची धुरा कोण सांभाळणार याबाबतची चर्चा सुरु झालीये. यामध्ये ऋतुराज गायकवाड आणि ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाच्या नावाची चर्चा आहे. (Ruturaj Gaikwad and Ravindra Jadeja name discussion for Chennai Super Kings captaincy after Mahendra Singh Dhoni)
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)
चेन्नईचा आक्रमक सलामीर ऋतुराज गायकवाडचा हा आयपीएलचा दुसरा मोसमच होता. मात्र ऋतुराजने दुसऱ्या मोसमातच ऑरेन्ज कॅप पटकावली. ऋतुराजने या 14 व्या मोसमात खोऱ्याने धावा केल्या. ऋतुराजने या पर्वातील एकूण 16 सामन्यांमध्ये 45.35 च्या सरासरी आणि 136.26 च्या स्ट्राईक रेटने 635 धावा चोपल्या. यामध्ये एक शतक आणि अर्धशतकांचा समावेश आहे.
ऋतुराजने चेन्नईला आयपीएलची ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ऋतुराजकडे सध्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ऋतुराजची नावाची कर्णधारपदी वर्णी लागण्याची अधिक शक्यता आहे.
रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja)
अष्टपैलू रवींद्र जाडेजाही धोनीनंतर चेन्नईच्या कॅप्ट्न्सीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. सध्या जाडेजा चांगल्याच फॉर्मात आहे. तसेच जाडेजा धोनीच्या मर्जीतला आहे. एक कर्णधार म्हणून जाडेजामध्ये हवे असलेले सर्व गुण आहे. जाडेजा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतो. जाडेजामध्ये निर्णायक क्षणी सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे जाडेजा धोनीचा उत्तराधिकारी बनू शकतो. त्यामुळे भविष्यात चेन्नईची कॅप्ट्न्सी कोण करणार, हे समजेल.