मुंबई : एक वर्षाहून अधिक काळानंतर कसोटी खेळणाऱ्या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत शानदार शतक झळकावले. या सामन्यात भारताने एक डाव आणि २३९ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यातील शतकी खेळीनंतर रोहित म्हणाला, मी नशीबवान आहे की पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभार आहे. २०१६मध्ये झालेल्या दुखापतीमुळे मी खचलो होतो. मी पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहेन की नाही याबाबतही शंका होती. मात्र मी नशीबवान आहे की स्वत:च्या पायावर उभा आहे, खेळतोय आणि धावा करतोय. म्हणूनच मी खुश आहे.
तो पुढे म्हणाला, भूतकाळात काय घडले मी याचा विचार करत बसत नाही. माझ्यासमोर जे आहे त्यावर मी लक्ष केंद्रित करतो. जेव्हा माझ्याकडे अनुभव नव्हता आणि मी संघात होतो तेव्हा अनेक मुद्द्यांवर विचार करायचो मात्र आता नाही.
माझ्यासमोर काय येणार आहे याबाबत मला स्वत:ला तयार ठेवले पाहिजे. भूतकाळात जे झालंय ते घडून गेलंय. तुम्ही ते बदलू शकत नाही. माझ्यासमोर ज्या गोष्टी आता आहेत त्या मी बदलू शकतो. दिल्ली कसोटीबाबत मी उत्सुक आहे. यानंतर वनडे सीरिज आणि दक्षिण आफ्रिका सीरिजबाबतही उत्सुकता आहे.