'खेल रत्न' पुरस्कारांची घोषणा, रोहित शर्मासह ५ खेळाडूंचा सन्मान

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारांची घोषणा

Updated: Aug 21, 2020, 10:05 PM IST
'खेल रत्न' पुरस्कारांची घोषणा, रोहित शर्मासह ५ खेळाडूंचा सन्मान title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटपटू रोहित शर्मासह ५ खेळाडूंची देशाच्या सर्वोच्च खेळ पुरस्कार असणाऱ्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. खेळ पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच ५ खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. 

खेळ पुरस्कार-२०२० समितीने शुक्रवारी रोहित शर्मा, महिला पैलवान विनेश फोगट, महिला हॉकी टीमची कर्णधार राणी रामपाल, महिला टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा आणि पॅरा एथलिट मरियप्पन थेंगावेलू यांची घोषणा केली. २९ ऑगस्टला राष्ट्रीय खेळ दिनाच्या निमित्ताने या खेळाडूंना खेल रत्न पुरस्कार दिला जाईल. 

रोहित शर्मा खेल रत्न पुरस्कार मिळणारा चौथा क्रिकेटपटू असेल. याआधी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आङे. तसंच ईशांत शर्मासह २७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कारांच्या अंतिम यादीमधून साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांचं नाव हटवण्यात आलं आहे. या दोन्ही नावांची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली होती.