धक्कादायक! रोहित शर्माची गावसकरांविरोधात BCCI कडे तक्रार; म्हणाला, 'माझ्यावर...'

Rohit Sharma Complaint Against Sunil Gavaskar: सुनिल गावसकर हे समालोचक आणि सामन्यांसंदर्भातील विश्लेषणात्मक कार्यक्रमांना हजेरी लावून आपली मतं मांडत असतात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 28, 2025, 09:17 AM IST
धक्कादायक! रोहित शर्माची गावसकरांविरोधात BCCI कडे तक्रार; म्हणाला, 'माझ्यावर...' title=
रोहित शर्माने केली तक्रार (प्रातिनिधिक फोटो)

Rohit Sharma Complaint Against Sunil Gavaskar: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेमध्ये फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेतील पहिल्या कसोटीमध्ये रोहित खासगी कारणांमुळे खेळला नव्हता. मात्र नंतर दुसऱ्या कसोटीपासून तो मैदानात दिसला. रोहित गैरहजर असताना पर्थ येथील कसोटीत जसप्रीत बुमरहाच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या कसोटीव्यतिरिक्त भारताला एकही कसोटी या दौऱ्यात जिंकता आली नाही. भारताने ही मालिका 3-1 ने गमावली. 10 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर चषक जिंकला.

रोहितची निराशाजनक कामगिरी

कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणूनही रोहितसाठी हा दौरा फारच निराशाजनक ठरला. याच मुद्द्यावरुन भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी रोहितवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. मैदानात नेतृत्व करताना रोहितचा दृष्टीकोन गावसकरांना पटल्याचं दिसत नाही. यावरुन त्यांनी बरीच टीका केली. या टीकेने नाराज झालेल्या रोहित शर्माने आता गावसकरांविरोधात थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने अशाप्रकारे ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या टिप्पण्यांसंदर्भात तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे.

गावसकरांनी नेमकी काय टीका केलेली?

बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माने 6 च्या सरासरीने अवघ्या 31 धावा केल्या. यावरुनच गावसकरांनी रोहित शर्माला भारतीय कसोटी संघात कायम ठेवलं पाहिजे का असा थेट सवाल टीका करताना उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं. तसेच मालिकेतील शेवटच्या कसोटीमध्ये संघाबाहेर बसण्याचा रोहितचा निर्णयही गावसकरांना पटला नव्हता. त्यांनी यावरूनही रोहितला चांगलेच झापले होते. रोहितचं अमर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भवितव्य अंधारात दिसत असल्याची टीका गावसकरांनी केली होती. रोहित शर्माने कर्णधारपदावरुन बाजूला होत इतरांना भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी घ्यावी, असा सल्लाही गावसकरांनी रोहित शर्माला दिला होता. 

रोहित शर्माने तक्रारीत काय म्हटलंय?

गावकरांनी केलेली ही टीका रोहित शर्माला फारशी पटलेली नसल्याने त्याने थेट बीसीसीआयकडे गावसकरांविरोधात तक्रार केल्याचं 'क्रिकब्लॉगर'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. चुकीच्या पद्धतीने आपल्यावर टीका केली जात असल्याचा दावा रोहित शर्माने केला आहे. तसेच काही मैदानाबाहेरील गोष्टींमुळे आपल्याला भारतीय संघासाठी समाधानकारक कामगिरी करता आली नाही, असंही रोहितने म्हटलं आहे. "माझ्यावर सुनिल गावकरांनी अशापद्धतीने टीका करण्याची गरज नव्हती असं रोहितला वाटत आहे. त्यामुळेच त्याने गावसकरांसंदर्भात बीसीसीआयकडे तक्रार दाखल केली आहे. गावसकरांच्या टीकेमुळे त्याला इतका तणाव जाणवू लागला की त्याने बीसीसीआयकडे तक्रार दाखल केली," असं सुत्रांनी म्हटलं आहे.

रणजीमध्येही अपयश

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रणजी चषक स्पर्धेत खेळणाऱ्या रोहितला घरगुती क्रिकेटमध्येही अपयशाचं तोंड पहावं लागत आहे. जम्मू-काश्मीरविरोधातील सामन्यात रोहित झटपट बाद झाल्याचं पाहायला मिळालं. जम्मू-काश्मीरविरुद्ध रोहित खेळत असलेला मुंबईचा संघ पराभूत झाला.