जुनी नाती, पुन्हा युती? चंद्रकांतदादा आणि ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दोन ओळींचा संवाद राज्यात चर्चेचा विषय झालाय. चंद्रकांतदादांच्या ज्या भावना आहेत त्या भावना भाजपमधील अनेक नेत्यांच्या असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.

पुजा पवार | Updated: Jan 30, 2025, 07:35 PM IST
जुनी नाती, पुन्हा युती? चंद्रकांतदादा आणि ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण  title=
(Photo Credit : Social Media)

मुंबई : राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपच्या युतीचे पुन्हा वारे वाहू लागलेत. याला निमित्त ठरलं चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात झालेली भेट. लग्नात चंद्रकांतदादा आणि उद्धव ठाकरेंची अवघी काही क्षणांची भेट झाली. या भेटीत मिलिंद नार्वेकरांनी हसत हसत मग युती कधी असा प्रश्न विचारला. चंद्रकांतदादांनीही आम्ही वाट पाहतोय असं हजरजबाबीपणं उत्तर दिलं. हा दोन ओळींचा संवाद राज्यात चर्चेचा विषय झालाय. चंद्रकांतदादांच्या ज्या भावना आहेत त्या भावना भाजपमधील अनेक नेत्यांच्या असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.

शिवसेना-भाजप युती तुटण्यास अमित शाह जबाबदार असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी युती होण्याविषयीच ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याबद्दल त्यांनी आभार मानलेत. दरम्यान पुढे काय घडणार आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे राऊतांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीये. 

हेही वाचा : आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळीबद्दल मोठी अपडेट; लाडकी बहीण योजनेसाठी 'या' योजना...

 

उद्धव ठाकरे- चंद्रकांत पाटलांमधील संवादाचा विषय सुप्रिया सुळेंच्याही कानावर गेला.  उद्धव ठाकरे हे कायम राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबतच राहतील असं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितलं.तसेच लग्न समारंभात झालेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये अशी सावध भूमिका काँग्रेसनं घेतलीये. तसेच लग्नसमारंभात झालेल्या त्या भेटीवर आणि त्या संवादाचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. लग्नसमारंभात युतीचे विषय होत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

निवडणूक निकालानंतर भाजप- उद्धव ठाकरेंची जवळीक वाढल्याचं ठळकपणं दिसतंय. चंद्रकांतदादा आणि उद्धव ठाकरेंमधील संवादाचा थेट युती होईल असा अर्थ काढण्याची गरज नाही. पण पडद्यामागे नक्कीच काहीतरी शिजतंय असा संशय मात्र बळावला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x