दुबई : ICC कडून दर आठवड्याला जाहीर होणारी आयसीसी रँकिंग (ICC Ranking) जाहीर झाली आहे. पहिल्या आठ स्थानापर्यंत फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान 9व्या तर इंग्लंडचा जो रूट 10व्या स्थानावर आहे. भारताचा विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या क्रमांकावर तर कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. (ICC ODI Ranking)
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar azam) पहिल्या स्थानावर आहे. बाबर ८७३ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. विराट ८२८ गुणांसह दुसऱ्या तर भारताचा कर्णधार रोहित ८९७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक चौथ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच त्याच्या खात्यात ७७९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात, कोरोना संसर्गामुळे न खेळलेल्या शिखर धवनला एक दर्जा गमवावा लागला आहे. तो १३व्या क्रमांकावरून १४व्या क्रमांकावर घसरला आहे.
गोलंदाजीत भारताचा जसप्रीत बुमराह सातव्या क्रमांकावर आहे. याशिवाय टॉप 10 मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.
गोलंदाजी क्रमवारीतही पहिल्या 10 स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट ७३७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवूड ७०९ गुणांसह कायम आहे. इंग्लंडचा ख्रिस वोक्स ७०० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.