नवी दिल्ली : ऋषभ पंतने केलेल्या शतकी खेळीनंतरही दिल्लीच्या टीमला २ रन्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे.
विजय हजारे ट्रॉफीतील ग्रुप बी च्या वन-डे मॅचमध्ये हिमाचल प्रदेशच्या टीमने दिल्लीवर दोन रन्सने विजय मिळवला. दिल्लीच्या टीमने सहा पैकी चार मॅचेस जिंकत १६ अंक मिळवले आहेत आणि अव्वल स्थान मिळवलं आहे. मात्र, क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीच्या टीमला आणखीन कसरत करावी लागणार आहे.
हिमाचल प्रदेशच्या टीमने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन प्रशांत चोप्राने १५० रन्स आणि अमित कुमारने ५२ रन्सची इनिंग खेळली. त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या टीमने ५० ओव्हर्समध्ये ३०४ रन्सपर्यंत मजल मारली.
फास्ट बॉलर ईशांत शर्माने ३९ रन्स देत दोन विकेट्स घेतले. नवदीप सैनीने एक विकेट घेतली. तर हिमाचल प्रदेशचे दोन बॅट्समन रन आऊट झाले.
हिमाचल प्रदेशच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या टीमचा ओपनर बॅट्समन उन्मुक्त चंद याने ४२ रन्सची इनिंग खेळली. त्यानंतर ऋषभ पंत (१३५ रन्स) आणि नितीश राणा (५२ रन्स) यांनी चौथ्या विकेटसाठी ११५ रन्सची भागिदारी केली.
नंतर नितीश राणा रन आऊट झाला. तर ऋषभ पंतने ९३ बॉल्समध्ये १३५ रन्स करुन आऊट झाला. पंतने आपल्या इनिंगमध्ये १६ फोर आणि पाच सिक्सर लगावले. दिल्लीची संपूर्ण टीम ४९.५ ओव्हर्समध्ये ३०२ रन्सवर ऑल आऊट झाली.