गेल-युवीला टक्कर, टी-10 क्रिकेटमधलं सगळ्यात जलद अर्धशतक

क्रिकेटमधला सगळ्यात छोटा फॉरमॅट म्हणजेच टी-10 क्रिकेटला शारजाहमध्ये सुरुवात झाली आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 17, 2017, 09:07 PM IST
गेल-युवीला टक्कर, टी-10 क्रिकेटमधलं सगळ्यात जलद अर्धशतक  title=

मुंबई : क्रिकेटमधला सगळ्यात छोटा फॉरमॅट म्हणजेच टी-10 क्रिकेटला शारजाहमध्ये सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच या प्रकारच्या क्रिकेटमध्ये नवे रेकॉर्ड पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत तीन मॅच खेळवल्या गेल्या आहेत. दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनं टी-10 क्रिकेटमधली पहिली हॅट्रिक घेतली. तर तिसऱ्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू रिली रुसोनं टी-10 क्रिकेटमधलं सगळ्यात जलद अर्धशतक पूर्ण केलं.

मराठा अरेबियंस टीमकडून खेळताना रिलीनं फक्त १८ बॉल्समध्येच अर्धशतक झळकवलं. रिलीच्या या तडाखेबंद खेळीमुळे मराठा अरेबियंसनं पंजाबी लिजंड्सचा १४ रन्सनी पराभव केला, तसंच या स्पर्धेची सेमी फायनलही गाठली आहे.

१८ बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण करणाऱ्या रुसोनं २७ बॉल्समध्ये ६७ रन्स केल्या. या खेळीमध्ये ६ सिक्सचा समावेश होता. मराठा अरेबियंसच्या टीमनं १० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १३० रन्स बनवल्या.

१० ओव्हरमध्ये १३१ रन्सचा पाठलाग करताना पंजाबी लिजंड्सची टीम १० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून ११६ रन्सच करू शकली आणि मराठा अरेबियंसची टीम १४ रन्सनी विजयी झाली. रिली रुसोला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.