विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे. शिखर धवनचं नाबाद शतक आणि श्रेयस अय्यरच्या ६५ रन्सच्या खेळीमुळे भारतानं श्रीलंकेनं ठेवलेल्या २१६ रन्सचा पाठलाग अगदी सहज केला. भारतानं ३२.१ ओव्हरमध्येच २१९ रन्स केले. शिखर धवनचं वनडे क्रिकेटमधलं हे १२वं शतक आहे. तर वनडे क्रिकेटमधला भारताचा हा सलग ८वा सीरिज विजय आहे.
मागच्या मॅचमध्ये द्विशतक करणारा रोहित शर्मा या मॅचमध्ये ७ रन्सवर आऊट झाला. त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरनं १३५ रन्सची पार्टनरशीप केली. अय्यर आऊट झाल्यानंतर दिनेश कार्तिकनं ३१ बॉल्समध्ये नाबाद २६ रन्स करून भारताचा विजय निश्चित केला.
त्याआधी भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा संघ ४४.५ ओव्हर्समध्येच २१५ रन्सवर ऑल आऊट झाला. भारताच्या कुलदीप यादव आणि युझुवेंद्र चहलनं प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याला २ आणि भुवनेश्वर कुमार-जसप्रीत बुमराहला प्रत्येकी एक विकेट मिळाली. श्रीलंकेच्या उपुल थरंगानं सर्वाधिक ९५ रन्स बनवले.
कुलदीप यादवला मॅन ऑफ द मॅच देऊन तर शिखर धवनला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. याचबरोबर भारतानं ३ वनडे मॅचची सीरिज २-१नं जिंकली आहे. धर्मशालामध्ये झालेल्या पहिल्या वनडेनंतर मोहालीतल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला होता.