'रवी शास्त्री ग्रेग चॅपलपेक्षाही धोकायदायक'

लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीवर जोरदार टीका होत आहे.

Updated: Aug 13, 2018, 05:31 PM IST
'रवी शास्त्री ग्रेग चॅपलपेक्षाही धोकायदायक' title=

लंडन : लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीवर जोरदार टीका होत आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ३१ रननं पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ झाला नाही. दुसऱ्या दिवशी विराट कोहलीनं दोन स्पिनर घेऊन खेळल्याचा निर्णय घेतला यानंतरच विराट आणि रवी शास्त्रीवर टीका व्हायला सुरुवात झाली. ढगाळ वातावरणात फास्ट बॉलरना मदत होते. हे माहित असतानाही उमेश यादवला काढून दोन स्पिनरना का संधी देण्यात आली असे सवाल क्रिकेट रसिकांकडून विचारण्यात येत आहेत.

विराट कोहलीबरोबरच रवी शास्त्रीलाही सोशल नेटवर्किंगवर टार्गेट केलं जात आहे. रवी शास्त्री हा ग्रेग चॅपलपेक्षाही धोकायदायक आहे. शास्त्रीमुळे भारतीय टीमचं ग्रेग चॅपलनं केलं त्याच्यापेक्षाही जास्त नुकसान होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननी निराशा केली. पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं १४९ आणि ५१ रनची खेळी केली. तर दुसऱ्या इनिंगमध्ये आर. अश्विन हा भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. अश्विननं पहिल्या इनिंगमध्ये २९ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद ३३ रन केल्या. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा १०७ रनवर तर दुसऱ्या इनिंगमध्ये १३० रनवर ऑल आऊट झाला. दुसऱ्या टेस्ट मॅचमधल्या पराभवासोबत भारत सीरिजमध्ये २-०नं पिछाडीवर आहे.

टी-२० सीरिजमध्ये २-१नं विजय मिळवल्यानंतर वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला होता. आता टेस्ट सीरिज जिंकायची असेल तर पुढच्या तिन्ही मॅच जिंकणं भारताला आवश्यक आहे. पण सध्याचा भारतीय टीमचा फॉर्म बघता हे आव्हान सध्या तरी अशक्यच दिसतंय.