मुंबई : टीम इंडियासोबत बॅटिंग सल्लागार राहुल द्रविड जाणार नसल्याचे स्पष्ट झालेय. टीम कोहली आगामी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. टीम कोहलीसोबत द्रविड जाणार नसल्याचे स्पष्टकरण प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी दिलेय.
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून नेमणूक राहुल द्रविड यांची निवड झालेय. द्रविड सध्या भारत अ आणि अंडर -१९ संघाचा प्रशिक्षक आहे. या संघांशी वचनबद्ध असल्याने द्रविड टीम इंडियासोबत विदेश दौऱ्यांवर जाणार नाही, असे विनोद राय यांनी शनिवारी सांगितले.
दरम्यान, झहीर खान याच्या करारासंबंधीचे मुद्दे मार्गी लावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय संघाचा माजी तेज गोलंदाज झहीर खान सध्या आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाशी करारबद्ध आहे. जहीर खान दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यासाठी उपलब्ध होऊ शकतो, असे संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी दिलेत.
पुढील वर्षी अंडर १९ विश्वचषक स्पर्धा आणि काही मालिका होणार आहेत. त्यामुळे द्रविड भारतीय संघासाठी उपलब्ध होऊ शकत नाही, असे सांगण्यात येत आहे.