भारतीय खेळाडूंची वेस्ट इंडिजच्या समुद्रात मजा मस्ती, सोबत अनुष्काही

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमधल्या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिजमध्ये दिमाखात पुनरागमन केलं.

Updated: Aug 27, 2019, 07:23 PM IST
भारतीय खेळाडूंची वेस्ट इंडिजच्या समुद्रात मजा मस्ती, सोबत अनुष्काही title=

एंटिगा : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमधल्या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिजमध्ये दिमाखात पुनरागमन केलं. टी-२० सीरिज ३-०ने जिंकल्यानंतर भारताने वनडे सीरिजही २-०ने खिशात टाकली. आता २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-०ने आघाडीवर आहे. एंटिगामध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा तब्बल ३१८ रननी विजय झाला. या विजयानंतर टीम इंडिया मजा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल याने वेस्ट इंडिजच्या समुद्रातला बोटीवरचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहली, मयंक अग्रवाल, आर. अश्विन यांच्यासोबतच विराटची पत्नी अनुष्का शर्माही दिसत आहे. 'एंडलेस ब्लूज' असं कॅप्शन राहुलने या फोटोला दिलं आहे.

पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये राहुलने ४४ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३८ रनची खेळी केली. तर विराटने पहिल्या इनिंगमध्ये ९ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रन केले. अजिंक्य रहाणेने या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ८१ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये शतक झळकावलं. २०१७ नंतर रहाणेचं टेस्ट क्रिकेटमधलं हे पहिलंच शतक आहे.

वेस्ट इंडिजसोबतच्या विजयाबरोबरच विराटच्या नावावर नवा विक्रम झाला आहे. परदेशामध्ये सर्वाधिक टेस्ट मॅच जिंकण्याचा विक्रम विराटने केला आहे.  विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने परदेशात २६ पैकी १२ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. तर सौरव गांगुलीच्या नेतृत्वात परदेशात भारताने २८ मॅचपैकी ११ मॅचमध्ये विजय मिळवला होता.

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार व्हायला आता विराट कोहलीला फक्त एका विजयाची गरज आहे. विराटने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. धोनी आणि कोहलीच्या नेतृत्वात भारताने प्रत्येकी २७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत.