बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून फेसबूकवर बनावट अकाउंट बनवल्याची घटना समोर आली आहे. याविरोधात संदीप पाटील यांनी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
संदीप पाटील यांच्या या बनावट अकाउंटवरुन त्यांच्या मित्रांकडे फेसबूक मेसेंजरच्या माध्यमातून खेळाडू आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचे नंबर मागण्यात येत होते. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. याबद्दल संदीप पाटील यांच्या जवळच्या मित्राने त्यांना माहिती दिली, तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
मागच्या २१ वर्षांपासून मी बोर्डासोबत काम करत आहे. माझ्याकडे सगळ्यांचे नंबर आधीपासूनच आहेत, त्यामुळे मी कोणाकडे नंबर कशाला मागू?. कोणत्याही क्रिकेटपटूचे अथवा अधिकाऱ्याचे नंबर मी मागितेल नाहीत, असं संदीप पाटील यांनी सांगितलं.
यानंतर संदीप पाटील यांनी बनावट फेसबूक अकाउंट बनवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात दादर मधील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल काही बोलण्यास तुर्तास नकार दिला आहे. पण या प्रकरणी तपास सुरू आहे, लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
संदीप पाटील यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे बनावट फेसबूक अकाऊंट बंद केलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी एटीएसने एकाला अटकही केली होती.